मोठी घोषणा! जुन्या पेन्शन योजनेबाबत निर्णय झाल्यास, निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना…

Old Pension Scheme |कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे की जुनी पेन्शन योजना आधी मान्य करा आणि मग अभ्यास करा. आधी कन्क्लुजन देऊन मग अभ्यास करणं याला अर्थ नाही. जी भूमिका मी घेतली ती भूमिका अजित पवारांनीही घेतली होती, असं फडणवीस म्हणाले.

devendra fadnavis
Maharashtra Assembly Budget 2023

Old Pension Scheme | मुंबई – जुनी पेन्शन योजना पुन्हा कार्यान्वित व्हावी याकरता सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. मंगळवारपासून राज्यातील १८ लाख कर्मचारी संपावर गेल्याने शिक्षण, आरोग्य, महसूल व्यवस्था कोलमडली आहे. सरकारने जुनी पेन्शन योनजेबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी विविध संघटनांकडून केली जातेय. यावर उत्तर देताना फडणवीसांनी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही काळजी करण्याचं कारण नाही. ही योजना लागू झाल्यास पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करू, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. अर्थसंकल्पाच्या चर्चेवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

हेही वाचा मंत्रीपदासाठी पुढे पुढे असणारे निर्लज्जपणे…, मंत्र्यांच्या गैरहजरीवरून अजित पवार आजही संतापले

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जो रिटायर्ड होतो त्याला जगण्याकरता पेन्शन आणि सोशल सिक्युरिटी मिळाली पाहिजे. त्यासाठी काय करता येईल? त्याकरता आपण एक समिती तयार करू. आताचं दायित्व काय आहे, नंतरचं दायित्व काय आहे यावर विचार केला जाईल. एकदा संपूर्ण दायित्व समोर आलं की चार-पाच पद्धतीने त्यावर वर्किंग करून त्यातून सोशल सिक्युरिटी, पेन्शनची सिक्युरिटी कशी द्यायची यावर विचार करता येईल. पण त्यावरच अडून राहिलो तर शक्य नाही. कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे की जुनी पेन्शन योजना आधी मान्य करा आणि मग अभ्यास करा. आधी कन्क्लुजन देऊन मग अभ्यास करणं याला अर्थ नाही. जी भूमिका मी घेतली ती भूमिका अजित पवारांनीही घेतली होती.”

फडणवीस पुढे म्हणाले की, “जुनी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी तीन ज्येष्ठ माजी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. सुबोध कुमार, सुधीर श्रीवास्तव, केपी बक्षी या समितीत आहेत. कर्मचारी संघटनांनी या समितीकडे जावं आणि त्यांचं म्हणणं मांडावं. आज लगेच कोणी रिटायर्ड होणार नाहीय. २०३० नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी संप सुरू आहे. समजा, आज कोणी रिटायर्ड होणार असेल तरीही ती योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी आज दिलं.