घर उत्तर महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ बोगस प्रमाणपत्र प्रकरणी मोठी अपडेट; असे झाले रॅकेट उघड

मुक्त विद्यापीठ बोगस प्रमाणपत्र प्रकरणी मोठी अपडेट; असे झाले रॅकेट उघड

Subscribe

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात विज्ञान पदवी, मेडिकल लॅब टेक्निशियन (एमएलटी) आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (डीएमएलटी) या अभ्यासक्रमांना प्रवेशच न घेता बनावट प्रमाणपत्राच्या आधारे दिलेल्या पदव्यांची नाशिक ग्रामीण पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. या विद्यार्थ्यांमार्फत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. यात चार जणांनी नाशिक, अहमदनगर, अकोला, जळगाव, यवतमाळ, पनवेल, ठाणे, पालघर, सोलापूर येथील विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी १३ विद्यार्थ्यांना चौकशीसाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी नगरमधील दोन विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएलटी आणि डीएमएलटी या अभ्यासक्रमाला २० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नव्हता. तरीही, चार संशयित आरोपींनी २० विद्यार्थ्यांसाठी मुक्त विद्यापीठाच्या नावाने बनावट गुणपत्रक, पदवी, पदविका तसेच विद्यापीठाच्या बनावट नावासह पदवी पडताळणीचे बनावट पत्र तयार केले. ते विद्यार्थ्यांना देत बनावट दस्तऐवज तयार केले. संशयित विद्यार्थ्यांनी पॅथालॉजी व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे कागदपत्रे सादर केली असता हा प्रकार उघडकीस आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी ती मुक्त विद्यापीठाकडे सादर करण्यात आली. त्यावेळी विद्यापीठाच्या उत्तीर्ण यादीत संबंधित मुलांची नावे आढळली नाहीत.

- Advertisement -

पडताळणीत विद्यार्थ्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी विद्यापीठाच्या परीक्षा कक्षाचे उप कुलसचिव मनोज नारायण घंटे यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नागपूर येथील सेंटर फॉर एज्युकेशनचा गौरव शिरसकर, कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रमेश होनामोरे, अहमदनगर येथील अशोक सोनवणे, मनमाड येथील संजय गोविंद नायर (रा. नांदगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी घेतली प्रमाणपत्रे

यवतमाळमधील सात विद्यार्थ्यांनी सेंटर फॉर एज्युकेशनच्या संशयित शिरसकरकडून, ठाणे जिल्ह्यातील तीन जणांनी सातार्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील होनामोरेकडून, अहमदनगरच्या एका विद्यार्थ्याने सोनवणेकडून आणि मनमाडच्या दोन जणांनी नायरकडून पदवी प्रमाणपत्र घेतली आहेत.

प्रमाणपत्रांची शहानिशा करण्यासाठी पोलिसांचे विद्यार्थ्यांना आवाहन

- Advertisement -

संशयित आरोपींनी राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र दिलेली आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना ती बनावट असल्याची माहिती नाही. आरोपींकडून दिली जाणारी बनावट आहेत, हे विद्यार्थ्यांना माहिती असते तर विद्यार्थ्यांनी नोकरी व व्यवसायासाठी प्रमाणपत्र घेतली नसती. शिवाय, भविष्यात पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागायला नको आणि त्यातून शैक्षणिक नुकसानही होवू नये, या कारणास्तव विद्यार्थ्यांनी संशयित आरोपींकडून प्रमाणपत्र घेतली नसती. संशयित आरोपींकडून ज्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र घेतली आहेत, ती बनावट आहेत की नाही, याची खात्री करून घ्यावी. प्रमाणपत्रे बनावट असतील तात्काळ नाशिक तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

विशेष तपासी पथकाची गरज

पॅथॉलॉजे लॅब सुरु करण्यासाठी बीएस्सी, एमएलटी आणि डीएमएलटी या पदव्यांची कागदपत्रे पॅरावैदक परिषदेकडे सादर केल्यावर पडताळणीत राज्यातील २० विद्यार्थ्यांना बनावट पदव्या दिल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपींनी बी.ए., बी. कॉम. बी. एस्सीचीसुद्धा प्रमाणपत्र दिल्याची शक्यता आहे. आरोपींनी दिलेल्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी केली तर ती बनावट असल्याचे समोर येऊ शकते. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने विशेष पथकाची आवश्यक आहे.

सत्यता पडताळणी समितीमुळे रॅकेट आले उघडकीस 

२० संशयितांची महाराष्ट्र पॅरावैद्य परिषद, मुंबईकडून विद्यापीठाकडे पडताळणीसाठी आली असून, ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या निदर्शनास आल्यावरून परीक्षा विभागाचे उपकुलसचिव मनोज घंटे यांनी फिर्याद दाखल केली. महाराष्ट्र परावैद्य परिषदेकडून पडताळणीसाठी प्रमाणपत्रे विद्यापीठाला प्राप्त झाल्यावर सत्यता पडताळणी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यातून ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचे सिद्ध होऊन संबंधित संशयितांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. विद्यापीठाच्या आधुनिक यंत्रणेमुळे प्रमाणपत्रे अथवा गुणपत्रके लगेचच तपासून त्यातील सत्य, असत्यता पडताळून पाहता येते. त्यामुळेच हे रॅकेट उघडकीस येण्यास मदत झाली आहे, असे मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी सांगितले.

प्राप्त अहवालानुसार मुक्त विद्यापीठाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार बनावट कागदपत्रांची फेरपडताळणी केली जात आहे. बनावट पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांना चौकशीसाठी नोटिसा दिल्या आहे. चौकशी आणखी माहिती समोर येणार आहे. त्यानुसार आरोपींपर्यंत धागेदार मिळतील. : विजय माळी, तपासी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक, नाशिक तालुका पोलीस ठाणे

- Advertisment -