…तर यांना राज्यपालांना जाब विचारण्याचा काय अधिकार? फडणवीसांचा मविआला सवाल

bjp devendra fadanvis slams mva leaders over governor bhagat singh koshyari chhatrapati shivaji maharaj controversial statement

राज्यात एकीकडे कर्नाटक सीमावाद मुद्दा पेट घेत आहे, तर दुसरीकडे राज्यातील तत्कालीन मविआ सरकार आणि मित्र पक्ष राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपच्या अन्य नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज तसेच राज्याच्या इतर मानबिंदूंवर करण्यात आलेली अवमानकारक वक्तव्ये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रद्रोही विधान आणि कर्नाटकविरोधात राज्य सरकारने घेतलेली नेभळट भूमिका, राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये नेण्याचे कट कारस्थान तसेच वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नावर शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करण्यासाठी 17 डिसेंबरला मुंबईत विराट महामोर्चा काढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुढील काळात अधिक पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआच्या या विराट मोर्चावर हल्लाबोल केला आहे. जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागतात, पुरावे मागितल्यावर माफी मागत नाहीत, त्यांना राज्यपालांना जाब विचारण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल फडणवीसांनी मविआ केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे आदर्श होते आणि राहतील. यामुळे कोणाच्या चुकीच्या विधानाने किंवा त्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्व कमी होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे कारण पुढे करत हा मोर्चा काढला जात आहे. दुसऱ्याचं कारणामुळे मविआची राज्यपालांवर नाराजी आहे, ती का आहे हे सर्वांना माहित आहे, यामुळे टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्पालांनी स्वत: माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आहेत असं सांगितले, असही फडणवीस म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी रायगड, प्रतापगड, सिंहगड आणि बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे देखील गेले. या प्रकरणाला ज्याप्रकारे वाढवलं जात आहे, त्यातून राज्यपालांसंदर्भात जुना वाद उकरून काढण्याचा प्रयत्न आहे. कुणी चुकीचं बोललं असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान बदलू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग राजकारणासाठी करणं चुकीचं आहे. जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागतात, पुरावे मागितल्यावर माफी मागत नाहीत, त्यांना राज्यपालांना जाब विचारण्याचा काय अधिकार आहे, असा संतप्त सवालही फडणवीसांनी केला आहे.


चैत्यभूमीवर लोटला भीमसागर; हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी तर सुरक्षिततेसाठी ‘ड्रोन’चा वापर