घरमहाराष्ट्रभाजपाला नवा प्रदेशाध्यक्ष पुढील आठ दिवसांत मिळणार?

भाजपाला नवा प्रदेशाध्यक्ष पुढील आठ दिवसांत मिळणार?

Subscribe

मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रा. राम शिंदे यांची नावे चर्चेत

भारतीय जनता पार्टीच्या नव्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची येत्या आठ दिवसांत निवड होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पक्षांतर्गत हालचाली गतिमान झाल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली. संभाव्य प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या मंत्री असलेले चंद्रकांत पाटील आणि प्रा. राम शिंदे यांची नावे चर्चेत असली तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतांची गणिते लक्षात घेता मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करणाराच प्रदेशाध्यक्ष भाजपाला हवा असल्याने चंद्रकांतदादांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.

जालना जिल्ह्यातून पाचव्यांदा खासदार म्हणून निवडणून आलेले विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. एक व्यक्ती एक पद या भाजपाच्या तत्वानुसार त्यांच्याजागी नव्या अध्यक्षाची नेमणूक होण्याची चर्चा लोकसभा निवडणुकीच्या निकालापासूनच होती. मध्यंतरी त्यासाठी पंकजा मुंडे, गिरीष महाजन यांचीही नावे चर्चेत होती. मात्र कालांतराने ती मागे पडली. सध्या तरी चंद्रकांत पाटील आणि प्रा. राम शिंदे यांची नावे चर्चेत असून त्यातही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याचे समजते.

- Advertisement -

राज्याच्या विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून भाजपाने त्यासाठी आतापासूनच तयारी केली आहे. नव्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवायच्या असतील तर त्याला आधी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे हे लक्षात घेता नवीन प्रदेशाध्यक्षपदाची निवड येत्या आठ दिवसांत होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -