घरमहाराष्ट्रफडणवीसांचे विश्वासू ब्रिजेश सिंह सीएमओत, तर परदेशीही 'मित्र'च्या सीईओपदी?

फडणवीसांचे विश्वासू ब्रिजेश सिंह सीएमओत, तर परदेशीही ‘मित्र’च्या सीईओपदी?

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. परंतु अद्यापही त्याचा शासन निर्णय निघालेला नाही. तसेच वरिष्ठ आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्तीला शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. सीएमओ आणि मित्रमध्ये या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने मंत्रालयातील वरिष्ठ सनदी अधिकारी आश्चर्यचकित झाले आहेत.

मित्रच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. डिसेंबरमध्ये या संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजय आशर आणि शिवसेनेचे माजी आमदार डॉ. राजेश क्षीरसागर यांची शिंदे-फडणवीस सरकारने नियुक्ती केली होती. अजय आशर हे ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून गेली काही वर्षे ते एकनाथ शिंदे यांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. तर, आता नियुक्ती करण्यात आलेले सीईओ प्रवीणसिंह परदेशी हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.

- Advertisement -

सत्तेवर येताच ठाकरे सरकारने प्रवीण परदेशी यांना मुंबई महापालिका आयुक्तपदावरून मे 2020मध्ये हटविले होते. त्यांनी 2019मध्ये पालिका आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर प्रवीण परदेशी विविध केंद्रीय समित्यांमध्ये सक्रिय होते आणि नोव्हेंबर 2021मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर केंद्र सरकारच्या एका समितीवर त्यांची नियुक्ती पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार सात महिन्यांपूर्वी स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा परदेशी मोड इन अॅक्शनमध्ये आले आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रवीण सिंह परदेशी हे त्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. अत्यंत प्रभावी आणि कार्य कुशल सनदी अधिकारी अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे.

तर, फडणवीस सरकारच्या काळात माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक असलेले ब्रिजेश सिंह आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयात सचिव म्हणून आले आहेत. भूषण गगराणी हे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तर विकास खारगे हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आहेत. आता या टीममध्ये ब्रिजेश सिंह यांचाही समावेश झाला आहे. ब्रिजेश सिंह हे सध्या अतिरिक्त महासंचालक (गृहरक्षक दल) या पदावर कार्यरत आहेत. ब्रिजेश सिंह यांचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात आणि फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -