घरताज्या घडामोडीसर्व 'ओके' आहे का? उद्धव यांना अडकवण्याच्या नादात एकनाथ शिंदेच अडकले नाहीत...

सर्व ‘ओके’ आहे का? उद्धव यांना अडकवण्याच्या नादात एकनाथ शिंदेच अडकले नाहीत ना?

Subscribe

मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने राजकीय वर्तुळात आता सत्तेत असलेल्या शिंदेगट आणि भाजप यांच्यात सगळं काही आलबेलं नसल्याच्या चर्चा सुरू झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारविरोधात बंडखोरी करून सत्तेत आलेले एकनाथ शिंदे यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन एक महिन्याचा कालावधी होत आहे. पण तरीही अजून मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने राजकीय वर्तुळात आता सत्तेत असलेल्या शिंदेगट आणि भाजप यांच्यात सगळं काही आलबेलं नसल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. मंत्रीपदावरून दोन्ही गटांत मतमतांतर असल्याने बोलणी फिस्कटत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे उ्द्धव यांना अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्री शिंदे स्वत:च तर अडचणीत सापडले नाहीत ना, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

महाराष्ट्र विधानसभेत एकूण सदस्यांची संख्या २८८ आहे. तर संविधानानुसार यातील १५ टक्केच सदस्यांना मंत्रीपद मिळू शकणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रातून जास्तीत जास्त ४२ जणांनाच मंत्रीपद मिळू शकते. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदही सामील आहेत. यामुळे सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात या दोन मंत्रीपदाव्यतिरिक्त ४० मंत्रीपद उपलब्ध आहेत. यामुळे आता शिंदेगट आणि भाजपमधील कोणत्या नेत्यांची या मंत्रीपदी वर्णी लागते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यास २६ दिवसांचा कालावधी उलटून गेला. पण तरीही अद्याप सत्तेत आलेल्या या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. तर राष्ट्रपती निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यताही वर्तवली जात होती. पण राष्ट्रपती निवडणूक होऊनही सत्तेतील सरकारच्या केंद्रीय विस्तारासाठी काहीच हालचाली दिसत नाहीयेत.

- Advertisement -

तर दुसरीकडे शिंदेगटाने ८ मंत्रीपद आणि ५ राज्यमंत्रीपदांची मागणी केल्याचे बोलले जात आहे. तर भाजपचे त्यांच्या कोट्यातील २९ आमदारांना मंत्रीपद देण्याचे लक्ष्य आहे. मात्र, अपक्ष आमदारांना भाजपने त्यांच्या कोट्यातून मंत्रीपद द्यावे, यासाठी शिंदेगट आग्रही आहे. यामुळे सध्या याचस्तरावर शिंदेगट आणि भाजप यांच्यात चर्चा सुरू आहेत. तर याचनिमित्ताने भाजप शिंदेगटाचे किती ऐकते याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहीले आहे. कारण शिवसेना सोडून शिंदेगटात गेलेल्या आमदारांपैकी बहुतेक आमदार मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. हे सर्व एकीकडे सुरू असतानाच शनिवारी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीस यांनी नेत्यांना दिलेला त्यागाचा आणि संयमाचा मंत्रही बरेच काही सांगून गेला आहे. तसेच सगळ्यांनाच मंत्रिमंडळात सामील करून घेता येणार नाही, हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यामुळे मंत्रीपदाची आस लावून बसलेले भाजपचे नेतेही अस्वस्थ झाले आहेत. परिणामी आमदारांना मंत्रीपद देण्याचे आव्हान फक्त एकनाथ शिंदेगटापुढेच नसून भाजपपुढेही आहे.

त्यातच मंत्रीमंडळ विस्ताराला विलंब होत असतानाच १०० कोटी देऊन मंत्रीपद मिळत असल्याचे समोर आले. याप्रकरणी चारजणांना अटकही झाली आहे. तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदेना काळजावर दगड ठेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवल्याचे खळबळजनक विधान केले. त्यानंतर फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. यापार्श्वभूमीवर शिंदेगट आणि भाजपमध्ये वरून जरी सगळे ‘ओके’ दिसत असले तरी आतमध्ये मात्र खळखळ सुरू असल्याचे मंत्रिमंडळ विस्ताराला होत असलेल्या विलंबावरून स्पष्ट होत आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -