मोदी-अदानी संबंधांवर काॅंग्रेस आक्रमक; 31 मार्चला राज्यभर घेणार पत्रकार परिषदा

३१ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेस पुन्हा एकदा मोदी-आदानी यांच्या संबंधांवर टीकास्त्र डागणार आहे. 

Congress press conference on Modi-Adani
३१ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत काॅंग्रेस पत्रकार परिषद घेणार

काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अदानी प्रकरणावरुन अनेकदा प्रश्न विचारले आहेत. त्यावरुन देशातील राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं असताना, काॅंग्रेसने मात्र भाजप सरकारवर हे हल्ले सुरुच ठेवले आहेत. काॅंग्रेस आता अधिक आक्रमक झाली आहे. ३१ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेस पुन्हा एकदा मोदी-आदानी यांच्या संबंधांवर टीकास्त्र डागणार आहे.

मोदी-अदानीच्या भ्रष्ट युतीने देशाच्या लोकशाही व संविधानावर घाला घातला असून सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून हुकूमशाही कारभार सुरु आहे. अदानीच्या उद्योगात २० हजार कोटी रुपये कुठून आले? राहुल गांधी हाच मुद्दा घेऊन मोदी सरकारला जाब विचारत आहेत. म्हणूनच काँग्रेस पक्षाने मोदी-अदानी भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करण्यासाठी २९ तारखेला देशभर पत्रकार परिषदा घेतल्या आणि उद्या दिनांक ३१ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषदा घेणार असल्याचे महाराष्ट्र काॅंग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

( हेही वाचा: गिरीश बापट यांच्या निधनानंतर नारायण राणेंनी घेतली कुटूंबियांची भेट )

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठाणे येथे, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात अहमदनगर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण परभणी तर पृथ्वीराज चव्हाण पुणे शहरात पत्रकार परिषदांना संबोधित करणार आहेत. माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष, मुख्य प्रवक्ते, प्रवक्ते, आमदार, खासदार व प्रमुख नेते राज्यातील इतर जिल्ह्यात पत्रकार परिषदा घेऊन मोदी-अदानी संबंधांवर भाष्य करणार आहेत.

( हेही वाचा: शाहीनबाग चालतं? हिंदू रस्त्यावर उतरले की त्रास होतो; हा कोणता न्याय? सर्वोच्च न्यायालयाच्या मतावर मनसेचे सवाल )

देशात हुकुमशाहीचे राज्य

अदानी सुमहात २० हजार कोटी रुपये कुठुन आले? याची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करावी ही मुख्य मागणी आहे, पण मोदी सरकार या चौकशीला घाबरत आहे. मोदी सरकारला थेट जाब विचारणाऱ्या राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करुन सरकारी घर खाली करण्याची नोटीसही मोदी सरकारने बजावली आहे. देशात हुकुमशाहीचे राज्य सुरु आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.