घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशिवसेनेच्या मतदार संघात भाजपाकडून विकासकामे; पाटलांकडून लोकसभेची मोर्चेबांधणी ?

शिवसेनेच्या मतदार संघात भाजपाकडून विकासकामे; पाटलांकडून लोकसभेची मोर्चेबांधणी ?

Subscribe

नाशिक : महाराष्ट्रात शिंदेंची शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीची सत्ता आहे. ‘आमची युती म्हणजे फेबीकॉल का जोड है’ असे काही दिवसपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. मात्र, शिंदे यांच्या सोबत असलेल्या खासदारांच्या मतदार संघात भाजपाकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात तर भाजपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी उघड लोकसभेच्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणी करायला सुरवात केली आहे. मागे विद्यमान खासदारांवर टीका करणारी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता तर त्यांनी मतदार संघातील असंख्य गावांना निधी मिळवून देत पद नसताना विकासकामे करण्याची किमया साधली आहे.

नाशिक मतदार संघात सिन्नर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक या चार तालुक्यांचा समावेश होता. या तालुक्यांमध्ये दोन वर्षांपासून बर्‍याच गावांत स्मशान भूमी, रस्ते, पथदीप अशा स्वरूपाच्या कामांची मोठी मागणी होती. यासंदर्भात दिनकर पाटील यांनी त्या गावांमधून प्रस्ताव मागितले होते. त्याअनुषंगाने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाटील यांनी गळ घालत मंत्र्यांच्या विशेष निधीच्या अंतर्गत संबंधित गावांच्या विकासकामांसाठी पाठपुरावा केला. त्या माध्यमातून प्रथमत: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील २५ गावांना अडीच कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

- Advertisement -

सिन्नर, इगतपुरी आणि देवळाली विधानसभा मतदार संघात ४७३ ग्रामपंचायतींना पत्रे पाठवून गावातील समस्या सोडविण्याचे आश्वासन पाटील त्यांनी दिले. याबाबत पाटील यांनी नुकतीच पत्रकार परिषद बोलवून माहिती दिली. ज्या गावात रस्ते नाहीत, स्मशानभूमी नाही. सभामंडप नाहीत अशा गावांसाठी गिरीश महाजन यांच्या २५/१५ या लेखाशीर्षातून भरीव असा निधी प्राप्त केला आहे. यातील काही २० ते ३० गावांना पाटील यांनी सुचविलेल्या कामांसाठी दोन कोटी ५० लाखांचा निधी मिळाला आहे. उर्वरित गावांच्या मूलभूत कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पाटील यांनी
घेतली आहे.

संकटमोचकाचा ‘आशीर्वाद’!

भाजपच्या अडचणीच्या काळात धावून संकटाचे निवारण करणारे गिरीश महाजन यांना संकटमोचक म्हणून संबोधले जाते. त्यांच्याच नेतृत्वाखाली नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आली. तसेच नाशिक शहरात पक्षाचे दोन आमदार निवडून आलेत. विविध मोर्चे, आंदोलने यांप्रसंगीही गिरीश महाजन यांची शिष्ठाई पक्षाला कामी आली आहे. ही बाब हेरत आता पुन्हा एकदा नाशिकची जबाबदारी महाजन यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे महाजन यांनी दिनकर पाटील यांच्या नेतृत्वशैलीवर विश्वास ठेवत त्यांच्याकडे तीन तालुक्यांच जबाबदारी दिली आहे. संकटमोचक गिरश महाजन यांचाच आशीर्वाद मिळाल्याने आता पाटील यांना लोकसभेचे मैदान दूर नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात झडत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -