घरमहाराष्ट्रपालिका निवडणुकीआधी महाभारत

पालिका निवडणुकीआधी महाभारत

Subscribe

दहीहंडी उत्सवादरम्यान राजकीय काला रंगल्यानंतरही भाजप आणि शिवसेनेत आगामी महापालिका निवडणुकांआधीच राजकीय महाभारत सुरू झाल्याचे चित्र आहे. मुंबई ही एका घराण्याची नसल्याचे सांगत भाजपने आपल्या मेळाव्यात शिवसेनेला लक्ष्य केले, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागण्याची वेळ येणे म्हणजे ही मोदी पर्व संपल्याची कबुली असल्याचा पलटवार शिवसेनेकडून करण्यात आला. भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्यास सुरुवात झाल्याने मुंबईत सध्या निवडणुकीआधीच राजकीय महाभारत रंगण्यास सुरुवात झाल्याची प्रचिती आली.

 मुंबई एका घराण्याची ठेवायची नाही – फडणवीस

काहींना महाराष्ट्रातील राज्य गेल्याचे दुःख होत नाही, पण मुंबईचे राज्य गेले की दुःख होते. कारण यांनी २५ वर्षे मुंबईच्या भरवशावर पूर्ण केले. त्यामुळे आता मुंबई महापालिका ही मूठभर लोकांची, एका परिवाराची, एका घराण्याची ठेवायची नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत त्यांना निवडणुकीचे आव्हान दिले.

आम्ही मराठीच्या नावाने मते मागणारे नव्हे, तर मराठीची सेवा करणारे लोक आहोत. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईच्या विकासासाठी जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे, असे सांगत फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर भाजपने मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपने आपल्या निवडणूक मोहिमेला ‘लक्ष्य २०२२ मुंबई ध्येयपूर्ती’ असे नाव दिले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबई भाजपच्या वतीने षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी शिवसेनेवर नाव न घेता हल्लाबोल केला. मुंबईकरांच्या प्रश्नांना हात घालताना फडणवीस यांनी शिवसेनेच्या भावनिक मुद्द्यांची खिल्ली उडवली. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच मुंबईतील भाजप आमदार उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सांगून जे निवडून आले त्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न धुळीस मिळवले. ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. ते इतके आत्मकेंद्री होते की स्वतःच्या पलीकडे पाहू शकले नाहीत. सर्वसामान्य मुंबईकरांकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे मुंबईकरांकडे पाहणारे लोक आपल्याला मुंबई महापालिकेत निवडून आणायचे आहेत, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

निवडणूक जवळ येईल तसे भावनिक मुद्दे उपस्थित केले जातील. कारण त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र हा मुद्दा ठरलेला आहे, पण त्यांना माहीत आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकत नाही. त्यामुळे तुम्ही डायलॉग तरी बदला. किती वर्षे त्याच डायलॉगवर तुम्ही जगाल, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे यांना लगावला. मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही, पण मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही दिल्लीला जात राहू. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीला जातात. तुम्हीही दिल्लीला गेलात पण महाराष्ट्राच्या हितासाठी नाही, तर सोनियांसमोर नतमस्तक होण्यासाठी गेलात, अशी टीका त्यांनी केली.

भाजप हा मराठी माणसाची लढाई लढणारा पक्ष आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा खटला जनतेच्या न्यायालयात काढायचा आहे. मुंबईच्या समस्यांचा खरा आरोपी कोण हे मुंबईकरांसमोर स्पष्टपणे मांडायचे आहे. त्यावेळी मुंबईकर जो न्याय देतील तेव्हा मुंबईत सत्तापालट झालेला असेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराचा मोठा विळखा बसला आहे. मुंबईतील सामान्य माणसाचा पैसा काही लोकांच्या तिजोरीत गेला. दरवर्षीच्या पावसाळ्यात तेच रस्ते आणि तेच खड्डे. महापालिकेचे काही प्रकल्प १५ वर्षे सुरू आहेत. हे प्रकल्प म्हणजे जुन्या लोकांसाठी दुभती गाय आहे. या प्रकल्पांतून वर्षानुवर्षे मलई खाल्ली जात आहे. कोरोना काळातील खरेदी ही प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार होता, असे फडणवीस म्हणाले. आता सर्व काही जोरात करायचे आहे. आपले मुख्यमंत्री घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे यांना लगावला.

पुढचा महापौर युतीचा
खरंतर गेल्या निवडणुकीत आपण मोठी मजल मारली होती. त्यावेळी आपण आपला महापौर बसवू शकलो असतो. तेव्हा आपली तयारी पूर्ण झाली होती, पण मित्रपक्षासाठी आपण दोन पावले माघार घेतली आणि त्यांना महापौर बनवू दिला, मात्र आता महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचा महापौर बनेल, पण कुठली शिवसेना, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणार्‍या एकनाथ शिंदे यांच्या खर्‍या शिवसेनेसोबत आपण मुंबई महापालिकेवर भगवा फडकवू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

शिवसेनेने मुंबईला फक्त भ्रष्टाचार दिला शेलार 

देशातील ७ राज्यांचा अर्थसंकल्प मुंबईपेक्षा कमी आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ४५ हजार कोटी रुपयांचा असताना शिवसेनेने मुंबईला फक्त भ्रष्टाचार दिला, अशी जळजळीत टीका मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी शनिवारी केली. ते म्हणाले की, मणिपूर, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा या राज्यांचे बजेट मुंबई महापालिकेपेक्षा कमी आहे. त्यामुळे यांनी मुंबईकरांना काय सुविधा दिल्या, असा आमचा सवाल आहे. मुंबईला मेट्रो देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईमध्ये ५२ पूल नितीन गडकरी यांनी दिले.

मुंबईला सुरक्षित करण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. मुंबईला बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी मोदी सरकारने दिली. कोस्टल रोडची परवानगी आणि मुहूर्तमेढ देवेंद्र फडणवीस सरकारने रोवली. मिठी नदीला स्वच्छ करण्यासाठी अर्धा निधी केंद्र सरकारने दिला. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पासाठी अर्धे पैसे केंद्र सरकारने दिले. मुंबईतील रुग्णालयांना राज्य सरकार निधी देत आहे. रेल्वेसाठी नरेंद्र मोदी सरकारने निधी दिला, याकडे लक्ष वेधत शेलार यांनी शिवसेनेने मुंबईकरांना काय दिले, असा सवाल केला.

मुंबईतील लढाई ही अधर्म आणि घराणेशाहीच्या विरोधातील आहे. एक परिवार २५ वर्षे चालला. मुंबईकर टाहो फोडत आहेत. आम्हाला लोकशाहीचे सरकार हवे आहे. महानगरपालिकेत मुंबईकरांना मुंबईकरांची सत्ता हवी आहे. मुंबईकरांची सत्ता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मिळेल. भारत नवभारत होत आहे. थोडेसे महाभारतदेखील बदलत आहे. कारण कौरव आणि पांडवांमधील युद्ध अटळ होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण कर्णाला सांगायला गेले की, तू या युद्धाचा भाग बनू नको. कारण धर्म पांडवांच्या बाजूने आहे. भगवान श्रीकृष्णाचे कर्णाने ऐकले नाही. आजचं महाभारत वेगळं आहे. देवेंद्ररूपी कृष्णाने एकनाथरूपी कर्णाला बाजूला काढले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या या लढाईत कृष्ण आणि कर्णही आमच्या बाजूने आहेत, असे शेलार म्हणाले.

मुख्यमंत्री, मंत्रीपद घरात ठेवणे गद्दारी नाही का? – केसरकर

मुख्यमंत्री आणि मंत्रीपद आपल्याच घरात ठेवणे ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाही का? हे बाळासाहेबांना तरी पटले असते का? ही गद्दारी नाही का, असा सवाल करीत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले. मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा कॅबिनेट मंत्री असे कधी महाराष्ट्रात झाले नव्हते, असेही त्यांनी सुनावले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरू केली. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य हे शिवसेनेतून फुटून निघालेल्या आमदारांची संभावना गद्दार अशी करीत आहेत. या टीकेला केसरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. ते म्हणाले की, दुसर्‍या महायुद्धात हिटलरने जे काही केले ते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात करीत आहेत. हिटलर जेव्हा संपूर्ण जगाला महायुद्धाच्या दरीत ढकलत होता तेव्हा त्याच्यासोबत गोबेल्स होता. हिटलरच्या सत्तेत गोबेल्स मंत्रीही होते. गोबेल्सची एक नीती होती. शंभर वेळा एक खोटं बोला मग लोकांना ते खरं वाटायला लागते. आज तेच काम महाराष्ट्रात आदित्य ठाकरे करीत आहेत, अशी टीका केसरकर यांनी केली.

आदित्य ठाकरे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जाऊन लोकांमध्ये खोटी माहिती पसरवण्याचे काम करीत आहेत. आदित्य हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असल्यामुळे मी त्यांचा आदर करतो, पण ते गोबेल्सच्या रस्त्यावर गेले तर ते आम्ही सहन करणार नाही. ही भूमी गोबेल्सच्या नीतींना मान्यता देणारी भूमी नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, असे केसरकर म्हणाले.

यावेळी केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले. छत्रपतींच्या घराण्याला तुम्ही वाकवण्याचा प्रयत्न केला. उमेदवारीसाठी तुम्ही संभाजीराजे यांच्याकडे करारपत्र मागितले. ही गद्दारी नव्हती का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बंद दाराआड दिलेला शब्द मोडणे याला काय म्हणणार, असा सवालही त्यांनी केला.

बेकायदेशीर सरकार लवकर कोसळणार – आदित्य ठाकरे 

देशात सत्यमेव जयतेला महत्व आहे, सत्तामेव जयतेला नाही. त्यामुळे हे गद्दारांचं हे बेकायदेशीर सरकार लवकरचं कोसळणार म्हणजे कोसळणार, असा दावा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी जळगाव येथे केला. बंड करायला हिंमत लागते, यांनी गद्दारी केली. गुवाहाटीला गेल्यावर ४० गद्दार लोक स्वतःला शिवसैनिक समजत होते, मजा करत होते, पण तिथला पूर त्यांना नाही दिसला. हिंदुत्वासाठी गेले नाही, एक दोन लोकांच्या स्वार्थासाठी गेले. स्वतःला खोके कसे मिळतील ? स्वतःच ओक्के कसं होईल ते पाहत होते हे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मोदी पर्व संपल्याची कबुली – उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबुली दिल्याचा पलटवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला.

फडणवीस यांनी शनिवारी भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शिवसेनेवर तुफान हल्ला चढवला. आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचे असल्याचे सांगत फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला. फडणवीस यांनी शनिवारी भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवायची आहे, असे म्हणत बाळासाहेबांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एक प्रकारे अधोरेखित केले आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.

फडणवीस यांचे आवाहन म्हणजे मोदी पर्व संपल्याचीच नांदी आणि कबुली आहे. भाजपच्या धोरणांनुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार आहे. यानिमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र यांनी समोर आणला. महाराष्ट्रातील जनता त्यांना मतपेटीतून याचे उत्तर देईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -