घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र"इंस्टावॉर" सुरू असताना सायबर सेल, गोपनीय शाखा, डीबी अन् सीआयडींचा फौजफाटा झोपला...

“इंस्टावॉर” सुरू असताना सायबर सेल, गोपनीय शाखा, डीबी अन् सीआयडींचा फौजफाटा झोपला का?

Subscribe

Nashik crime नाशिक : इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर काही तरुण सातत्याने पोस्ट टाकातात.. एकमेकांना शिवराळ भाषेत आव्हाने देतात.. फिल्मी स्टाईलने संवादफेक करत धमक्या देतात.. एकमेकांना मारण्याची भाषा होते.. किंबहुना एकमेकांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यांचे इन्स्टाग्रामवर थेट प्रक्षेपण करतात.. हे प्रक्षेपण शे-सव्वाशे लोक लाईव्ह बघत असतात.. या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांचे समर्थकही आपापल्या ‘भाईंच्या डेअरिंग’चे जाहिरपणे ‘कमेंटबॉक्स’मध्ये कोडकौतूक करतात… असा ‘धुडगूस’ सोशल मीडियावर खुलेआमपणे घातला असतानाही पोलिसांना अशा गुंड प्रवृत्तीच्या ‘व्हिडिओबाज’ पोरांची खबरही मिळत नाही ! (brutal murder)

विशेष म्हणजे, अशा पोस्टवर कमेंट करणारे अनेक ‘महाभाग’ गुन्हेगार (criminal) असतात. तरीदेखील त्यांच्यावर वचक ठेवण्यात पोलिसांना अपयश आले आहे. सोशल मीडियावर नजर ठेवणारा सायबर सेल अशावेळी काय करतो? हे तरुण एकत्र येऊन असे व्हिडिओ तयार करतात तेव्हा पेट्रोलिंगसाठी नियुक्त केलेले कर्मचारी काय करत असतात? कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तयार केलेल्या गोपनीय शाखेतील कर्मचारी काय करतात? गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासाठीची गुन्हे शाखा काय करते? राज्य शासनाच्या अखत्यारितील सीआयडी विभागात काम करणारे काय करतात? अशा घटना होण्यापूर्वी हे सारेच विभाग झोपी गेलेले असतात का? हे आणि असे असंख्य प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.

- Advertisement -

अर्थात हे प्रश्न सर्वसामान्यांना पडत असले तरी पोलिसांच्या विरोधात जाहिरपणे ते उपस्थित करण्याचे धारिष्ठ्य कोणी करत नाही. कारण गुन्हेगारांऐवजी सर्वसामान्यांवरच पोलिसांची दहशत इतकी असते की, ते पोलिसांबाबत बोलायलाही कुचरतात. येथे प्रश्न अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेचा आणि त्यापूर्वी इन्स्टाग्रामवर चाललेल्या ‘सोशल वॉर’चा आहे. हा ‘वॉर’ गेल्या दोन वर्षांपासून जाहीरपणे सुरू असतांना संबंधित टवाळखोरांवर पोलिसांना वचक कसा ठेवता आला नाही? त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे ज्याचा जीव गेला त्या संदीप आठवलेवर कॉलेजरोडवरील एका कॅफेवर काही दिवसांपूर्वीच चाकू, सुर्‍यांनी जीवघेणा हल्ला झाला असताना आणि त्याचे सीसी कॅमेरा फुटेजही उपलब्ध असताना या घटनेला गांभीर्याने घेऊन तपासाअंती हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात का घेतले नाही?

या हल्लेखोरांना ताब्यात घेतले असते तर कदाचित शिवाजी चौक परिसरातील खुनाची घटना टळू शकली असती. आजवरच्या बहुतांश घटनांचे कारस्थान शहरात अवैधरित्या जेथे दारु पिली जाते त्या हॉटेल्समध्ये रचले जाते. अधिकृत बारमध्ये सीसी कॅमेरे लावलेले असल्यामुळे त्यापासून वाचण्यासाठी बहुतांश गुन्हेगारांनी शहरातील दारुच्या अवैध हॉटेल्सचा अड्डा बनवलेला आहे.

- Advertisement -

अशा हॉटेल्सला ग्रामीण भागात पूर्णत: मज्जाव करण्यात आला आहे. जे काम पोलीस अधीक्षकांना करता आले ते काम पोलीस आयुक्तांना का करता येऊ नये, असा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेनिमित्ताने उपस्थित होत आहे. केवळ दारूच नव्हे तर गांजा, अफू, चरस या आणि तत्सम मादक पदर्थांचा अवैध धंदा खुलेआमपणे सुरू असताना त्यावरही पोलिसांना नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचे दिसून येते. शहरात गेल्या वर्षभरात ज्या खुनाच्या घटना घडल्या आहेत, त्यातील बहुतांश घटना अशाच व्यसनाधीन गुन्हेगारांकडूनच घडल्याचे स्पष्ट झाले आहे. तरी देखील अवैध मादक पदार्थांचा बाजार सर्रासपणे सुरू असल्याने संबंधित विक्रेत्यांना नेमका आशीर्वाद कोणाचा असाही प्रश्न पोलिसांकडे अंगुलीनिर्देश करत विचारला जात आहे.

वेळीच कारवाई का नाही ?

शहरात किशोरवयीन मुलांसह तरुणाईमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे आकर्षण वाढत आहे. अनेक मुले सोशल मीडियावर गुन्हेगारीशी संबंधित डायलॉग, फोटो व व्हिडीओ अपलोड करत यूजर्स वाढवत असतात. युजर्सने दिलेल्या कमेंटमुळे पोस्ट अपलोड करणारे स्वत:ला भाई समजून दहशत माजवण्यासाठी प्रक्षोभक व्हिडीओ अपलोड करतात. त्यातून गुन्हेगारी वाढत आहे. एरवी पोलीस सोशल मीडियावर वॉच असल्याचे सांगत असले तरी गुन्हेगारीशी संबंधित व्हिडीओ अपलोड करणार्‍यांवर वेळीच कारवाई केली जात नाही की त्यांच्या पोस्ट, व्हिडीओकडे लक्ष दिले जात नाही. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नियुक्त केलेल्या पोलिसांच्या प्रत्येक विभागाने प्रामाणिक प्रयत्न केल्यास गुन्हेगारी रोखण्यास मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -