घरमहाराष्ट्रदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनरेगाच्या कामांमध्ये वाढ

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनरेगाच्या कामांमध्ये वाढ

Subscribe

राज्यात सध्या एकूण ३८ हजार ८११ कामे चालू असून त्यावर ३ लाख ७७ हजार ३२८ इतकी मजूर उपस्थिती आहे.

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यातील मजुरांना ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलद गतीने कामे उपलब्ध करून दिली जात आहे. या योजनेअंतर्गत चालू वर्षामध्ये ९८.३१ टक्के कामांची मजुरी वेळेआधीच देण्यात आली आहे. राज्यात चालू आठवड्यात मजूर उपस्थितीमध्येही वाढ झाली असून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनरेगाच्या कामांची मागणी होताच कामे तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

मजूर उपस्थितीमध्ये झाली वाढ

संपलेल्या आठवड्यामध्ये मागील आठवड्यापेक्षा मजूर उपस्थितीमध्ये ३३ हजार ९६९ ची वाढ झाली आहे. राज्यात सध्या एकूण ३८ हजार ८११ कामे चालू असून त्यावर ३ लाख ७७ हजार ३२८ इतकी मजूर उपस्थिती आहे. एकूण ५ लाख ७९ हजार ४८१ इतकी कामे शेल्फवर असून यामध्ये मजूर क्षमता १२९०.७१ लाख मनुष्यदिवस इतकी आहे. शेल्फवरील कामांपैकी ४ लाख ७४ हजार १८९ कामे ग्रामपंचायतीकडे आणि उर्वरित १ लाख ०५ हजार २९२ कामे तालुका यंत्रणेकडे आहेत.

- Advertisement -

९.०६ लाख मजुरांना मजुरी उपलब्ध

या योजनेंतर्गत राज्यामध्ये २०१८-१९ या वर्षात १७.९३ लाख कुटुंबातील ३२.७६ लाख मजुरांना मजुरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. चालू वर्षी २०१९-२० या वर्षात आतापर्यंत एकूण ५.३२ लाख कुटुंबातील ९.०६ लाख मजुरांना मजुरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच २०१९ या वर्षाकरिता एकूण १० कोटी मनुष्यदिवस निर्मिती अंदाजण्यात आलेली आहे. मे २०१९ अखेर एकूण ३ कोटी मनुष्यदिवस निर्मिती अंदाजण्यात आलेली आहे. २०१८-१९ या वर्षात ८ कोटी ४६ लाख मनुष्यदिवस निर्मिती झालेली आहे. २०१९-२० या वर्षात राज्यात आत्तापर्यंत एकूण २५७.७० कोटी रुपये इतका खर्च झालेला असून यात २३०.५१ कोटी रुपये इतका अकुशल मजुरीवरील खर्चाचा समावेश आहे. २०१८-१९ या वर्षामध्ये एकूण रुपये ३ हजार २८९ कोटी रुपये इतका खर्च झालेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -