घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023अवकाळीने शेतकरी चिंताग्रस्त; सभागृहात सरकार म्हणतं, पंचनामे सुरू...!

अवकाळीने शेतकरी चिंताग्रस्त; सभागृहात सरकार म्हणतं, पंचनामे सुरू…!

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 |उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळीची संपूर्ण माहिती मागवली असून पंचनामे सुरू असल्याचं सभागृहात सांगितलं. मात्र, अजित पवारांसह अनेक नेत्यांनी यावर हरकत घेत यावर आजच निर्णय जाहीर करण्याची विनंती केली.

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ माजवला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाळीव प्राण्यांसह शेतपीके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असा स्थगन प्रस्ताव आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडला. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. सुरुवातीलाच शेतकऱ्यांचा प्रश्न छेडण्यात आला. यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळीची संपूर्ण माहिती मागवली असून पंचनामे सुरू असल्याचं सभागृहात सांगितलं. मात्र, अजित पवारांसह अनेक नेत्यांनी यावर हरकत घेत यावर आजच निर्णय जाहीर करण्याची विनंती केली.

गारपीटीने पीकं भूईसपाट झाली आहेत. गहू, कांदा, टोमॅटो, हरभरा, द्राक्ष संत्री, आंबा, मका, ज्वारीला फटका बसला आहे. पाळीव प्राण्यांनाही फटका बसला आहे. शेतकरी स्वतःला मारून घेतोय. आत्मक्लेष करतोय. अनेक वर्षांत अशी परिस्थिती पाहिली नव्हती. हातातोंडाशी आलेलं पीक गेलं आहे. भाजीपाल्याचं नुकसान झालं. कोथिंबीर फुकटात विकायला लागली. त्यामुळे सरकारने केंद्र सरकारीच टीम तातडीने बोलावणार का? त्यांना काही मदत करणार का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार स्थगन प्रस्तावाद्वारे मांडला.

- Advertisement -

नाना पटोले यांनीही याबाबत मत मांडलं. ९७ दाखल करून कामकाज बंद करावं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी. कांदा, कापूस शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. ९९३७ लोकांची वीजतोडणी कापली गेली आहे. कांद्याची अद्यापही खरेदी झालेली नाही. कापसाला अळी लागत असल्याने लोकांना त्वचारोग झालाय, या समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. तर, छगन भुजबळ यांनीही आक्रमक भूमिका घेतली. अख्खं जग होळी खेळत होतं तेव्हा शेतकऱ्यांच्या जीवनाचा बेरंग झाला होता. नाशिकमध्ये अख्खा गाव विकायला काढलाय, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपला संताप व्यक्त केला.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांची माहिती शासनाने मागवली असून उर्वरित माहिती घेणं सुरू आहे. त्यामुळे बाधित ठिकाणी मदतीचे प्रस्ताव मागवले असून या सर्व ठिकाणी तत्काळ मदत केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसंच, आतापर्यंत केलेल्या पंचनाम्याची सविस्तर आकडेवारीही फडणवीसांनी यावेळी दिली.

- Advertisement -

आठ जिल्ह्यांमध्ये एकूण १३ हजार ७२९ हेक्टर नुकसान झालं आहे. पालघरमध्ये विक्रमगड आणि जव्हार भागात ७६० हेक्टरचं काजू आणि आंब्याचं नुकसान आहे. नाशिकमध्ये २६८५ हेक्टर गहू, भाजीपाला, द्राक्ष आणि आंब्याचं नुकसान आहे. धुळ्यात ३हजार १८४ हेक्टरमध्ये ज्वारी, केळी, पपई, नुकसान झालं आहे. नंदूरबारमध्ये १५७६ हेक्टरचं मका, गहू, हरभरा, केळी, पपई, आंबा यांचं नुकसान आहे. तर, जळगावमध्ये २१४ हेक्टरमध्ये गहू, मका, ज्वारी, केळी बाधित झाली आहेत. अहमदनगरमध्ये ४१०० हेक्टर मका, गहू, भाजीपाला वाया गेला आहे. तर, बुलढाणा ७७५ हेक्टर मका गहू, ज्वारी, कांदा आणि वाशिममध्ये ४७५ गहू हभरा, फळपिकांचं नुकसान झालं आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

दरम्यान, या एवढ्याच माहितीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेप घेतला. यावर ठोस उपाययोजना कऱण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत मागच्या चक्रीवादळादरम्यान झालेली नुकसान भरपाई अद्याप का दिली नाही असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -