घरमहाराष्ट्रमी शिवसेना घडवली, संपवली नाही; नारायण राणे यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा

मी शिवसेना घडवली, संपवली नाही; नारायण राणे यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा

Subscribe

माझ्या वाटेला येऊ नका. माझी सुरक्षा सोडून मी तुम्ही सांगाल तेथे यायला तयार आहे, असे आव्हान राणे यांनी राऊत यांना दिले

मुंबई : माझा इतिहास शिवसेना घडविण्यामध्ये आहे. शिवसेना संपविण्यामध्ये नाही, असे स्पष्ट करत संजय राऊत हे शिवसेना वाढविणारे नाहीत तर संपवणारे आहेत. राऊत हे मातोश्रीला सुरुंग लावणारा विषारी प्राणी आहे, अशी जळजळीत टीका भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी येथे केली.

माझ्या वाटेला येऊ नका. माझी सुरक्षा सोडून मी तुम्ही सांगाल तेथे यायला तयार आहे, असे आव्हान राणे यांनी राऊत यांना दिले. एवढेच नव्हे तर संजय राऊत हे राज्यसभेत असताना उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल जे काही बोलायचे ते शिवसेना पक्षप्रमुखांना भेटून सांगणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून नारायण राणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. राणे यांनी ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखावरून संजय राऊत यांच्यावर टीका करताना आपण त्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला होता. तर हिंमत असेल तर पोलीस संरक्षण सोडून समोरासमोर येण्याचे आव्हान राऊत यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपचे आमदार राम कदम हे आज लोकांना काशीला घेऊन जात आहेत. ते पवित्र काम करीत आहेत. आता रामाचे कार्य असताना येथे रावणाचे काय काम आहे, असा टोला लगावत त्यांनी राऊत यांच्यावर संताप व्यक्त केला.

शिवसेनेच्या १९ जून १९६६ पासूनच्या पाहिल्या ३९ वर्षांत शिवसेना वाढविण्याचे काम मी केले. मी शिवसेना संपविण्याची सुपारी घेतलेली नाही, ती सुपारी संजय राऊतने घेतली आहे. आज जो त्यांना आनंद होतोय तो शिवसेना संपविण्याचा होतोय. शिवसेनेचे ५६ आमदार होते, आज १२ पण राहिलेले नाही, अशी टीका राणे यांनी केली. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या पक्षातील नेत्यांनी गेल्या अडीच वर्षांत एक तरी विधायक, सामाजिक, धार्मिक कार्य केल्याचे सांगावे. आपण कोणतेही संरक्षण मागितलेले नाही. मी शिवसेनेत असताना ज्यांच्याविरुद्ध लढलो ते देशातलेच नव्हे तर बाहेरचेही होते. माझ्यावर हल्ला करणार म्हणून पोलिसांनी त्यांना अटकही केली आहे. त्यामुळे १९९० पासून मला पोलीसांनी संरक्षण दिलेले आहे, असे सांगतानाच राणे यांनी  संजय राऊत त्यावेळी शिवसेनेतही नव्हते. तर त्यावेळी ते शिवसेनेच्याविरोधात लिहित होते, अशी टीका केली.

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक

महाराष्ट्र राज्य शिवकल्याणकारी व्हावे, या राज्यात येणारा उद्योगपती, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, जनतेला सुखी आणि समाधानी करण्याचे कार्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत, असे कौतुक करत या सरकारचे कार्य सर्वांना दाखवा, असे आवाहन राणे यांनी पत्रकारांना केले. मी केंद्रीय मंत्री आहे. माझ्या अखत्यारित सहा कोटी ३० लाख उद्योजक आणि उद्योगपती आहेत. मी संपूर्ण राज्यात फिरतो आणि उद्योग-रोजगार वाढवण्याचे काम करतो. हा उद्योग संजय राऊतांना नाही, असा टोला राणे यांनी राऊत यांना लगावला.


हेही वाचाः आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ, मालमत्तेची प्रत्यक्ष चौकशी सुरू

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -