घरताज्या घडामोडीजलसंपदा मंत्री जयंत पाटील शुक्रवारी कर्नाटक दौ-यावर, अलमट्टी धरणातील पाणी विसर्गावर करणार...

जलसंपदा मंत्री जयंत पाटील शुक्रवारी कर्नाटक दौ-यावर, अलमट्टी धरणातील पाणी विसर्गावर करणार चर्चा

Subscribe

पूरनियंत्रणाचे काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसे चांगले होईल यादृष्टीने ही बैठक आयोजित

पावसाळ्यात अलमट्टी धरणातून होणार्‍या पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे या पूरनियंत्रणाचे काम महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने करण्याच्या दृष्टीने राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील उद्या,शुक्रवार कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढताच सांगलीतील पूरपरिस्थिती गंभीर बनते. यामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा लागतो. या संदर्भात समन्वय साधण्याच्या दृष्टीने कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यासोबत शुक्रवार सकाळी १०.३० वाजता बैठक होणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील आणि कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते त्यापासून किमान नुकसान होईल आणि पूरनियंत्रणाचे काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसे चांगले होईल यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सचिव स्तरावर बैठक झाली आहे. आता मंत्री स्तरावरबैठक होत आहे. शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल हा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

तिन्ही पक्षांनी संघटीतपणे काम करावे

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. तिघांनी एकत्रित राहण्यास प्राधान्य द्यावे. प्रत्येक पक्षाचे बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटितपणाने काम करणे अपेक्षित आहे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केली. आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्यास समविचारी पक्ष एकत्र राहतील, असा विश्वास व्यक्त केला.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सध्या पक्षवाढीसाठी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करत असतील. परंतु, निवडणूका जवळ आल्यावर कदाचित ते वेगळा विचार करु शकतील. पण त्यांनी तसा विचार केला नाही तर मग जे समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यात आता निवडणुका नाहीत. त्यामुळे यावर रोज चर्चा कशाला करायची. ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी नक्कीच चर्चा करु. ज्यावेळी निवडणुका होतील त्यावेळी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन चर्चा होईल, असेही पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -