नितेश राणेंची राजकीय अपरिपक्वता दिसते, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरुन किशोरी पेडणेकरांची टीका

Kishori pednekar slams Nitesh rane on letter written to the cm uddhav thackeray
नितेश राणेंची राजकीय अपरिपक्वता दिसते, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरुन किशोरी पेडणेकरांची टीका

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईतील तुंबईवर प्रश्न केला होता. तसेच मुंबईत ३८६ फ्लडींग पाईंट आहेत. तिथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप देण्यापलिकडे आपण काय केले आहे का? असा सवाल नितेश राणेंनी केला आहे. यावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नितेश राणे यांची राजकीय अपरिपक्वता दिसली असल्याचा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. ज्या आयुक्तांच्या कार्यालयात तुम्ही ४-४ तास गप्पा मारता त्यांना पत्र लिहा असा सल्ला किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

मुंबई माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी भाजप आमदार नितेश राणेंच्या पत्रावर निशाणा साधला आहे. अपरिपक्वता राजकारणात आणखी वाढू लागली आहे. त्या अपरिपक्वतेचा राजकारणातील भाग बनून नितेश राणे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. बऱ्यापैकी जन्मापासून त्यांना राजकारणाचे धडे आणि राजकारण रक्तात भिनलं आहे. परंतु ही समज नाही की प्रशासक तर आहेच परंतु या संदर्भात उदाहरण द्यायचे झाले तर आसाममध्ये पूर आला, हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलन होत आहे. याचे उत्तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारु शकत नाही.

कारण पंतप्रधानांना बरीच काम आहेत. त्यांच्या खाली सिस्टम आहे. त्यांनी हे सगळं पाहायचे आहे. त्या सिस्टमला विचारले पाहिजे. गाव पातळीपासून सुरुवात केली तर सरपंच ते कलेक्टरपर्यंत पाठपुरावा झाला पाहिजे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. थेट त्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा गुडीगुडी करुन ज्या आयुक्तांकडून काम करुन घेत आहात. ज्यांच्या कार्यालयात बसून ४-४ तास गप्पा मारत आहात. त्या आयुक्तांना प्रश्न विचारा. त्या आयुक्तांकडे सगळी धुरा आहे. त्यामुळे त्यांना विचारा. थेट पत्र पाठवायचे माध्यमांना दाखवायचे आणि स्वतःची प्रसिद्धी सुरु असून हा स्टंट असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

पेडणेकरांचा सदाभाऊ खोतांवर निशाणा

मुंबापुरीच्या महापौर किंवा नगरसेवकांनी सांगावं इतकी वाईट वेळ सदाभाऊ खोत यांनी स्वतःवर आणली. फार वाईट वाटत आहे. तुम्ही विकृत प्रवृत्तीला पाठींबा देताय असे दिसून येत आहे. याचा निषेध आहे. कारण त्या पोस्टला कोणी समर्थन देऊ शकत नाही. दिले नाही पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार देशातील एकमेव व्यक्तिमत्व आहे. जे सगळ्यांना माहिती आहेत. राजकारणात त्यांचे अनेक वर्षे गेली आहेत. केतकीसारख्या लोकांना समर्थन देणं म्हणजे राजकीय अपरिपक्वता आहे. असं मला वाटत असल्याचे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

बायकोचं काय चाललंय असा प्रश्न फडणवीसांना पडला असेल

देवेंद्र फडणवीससुद्धा वाचतील तेव्हा त्यांना प्रश्न पडेल की, माझ्या बायकोचे असं काय चाललं आहे. असा त्यांना वाटेल, त्यांच्या ट्विटचा काही अर्थच लागत नाही आहे. ट्विट करुन फक्त चर्चेत राहायची त्यांना सवय आहे. त्यामुळे एवढ्या गांभीर्याने आम्ही बघत नाही. वजनामुळे राजकीय वजन वाढत नाही. तर प्रत्येकजण आपल्या कामामुळे आणि पुण्याईनुसार त्याचे राजकारणात वजन वाढत असतं असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.


हेही वाचा : राज्यातील आगामी मनपा निवडणुकीत एक परिवार, एक तिकीट; नाना पटोलेंची घोषणा