विधान परिषद निवडणूक : उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपली, कोणाविरोधात कोण लढणार?

Legislative Council Elections | नाशिक आणि अमरावतीमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. तर, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूक होणार आहे. ३० जानेवारी रोजी मतदान होऊन २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

Vidhan Parishad

Legislative Council Elections | मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी राज्यात चुरस सुरू आहे. या मतदारसंघांमधून बाजी मारून सभागृहात सदस्य संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, निवडणुकांमध्ये राजकीय नाट्य रंगले नाही तरच नवल. विधान परिषदेच्या या निवडणुकांमध्येही नाट्यमय घडामोडी घडताहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून कोण उभं आहे आणि कोण कोणाला शाह-कटशाह देणार ते पाहुयात.

आज शेवटच्या दिवसांपर्यंत ११८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सर्वाधिक म्हणजे ३४ अर्ज हे अमरावती पदवीधर मतदारसंघात दाखल झाले आहेत. या अर्जांची शुक्रवारी छाननी होणार असून १६ जानेवारी ही अर्ज माघारीची मुदत आहे. या मुदतीनंतर विधान परिषद निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

नाशिक आणि अमरावतीमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. तर, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूक होणार आहे. ३० जानेवारी रोजी मतदान होऊन २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

नाशिकमध्ये एकतर्फी लढत

विधान परिषदेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि युती अशी थेट दुहेरी लढत पाहायला मिळणार आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने डॉ.सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तांबेंनी आपली उमेदवारी मागे घेत सुपूत्र सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली. पंरतु, तांत्रिक घोळ झाल्याने सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. दरम्यान, मी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला असला तरीही माझा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे, असं सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केलं आहे. तर, आजच्या शेवटच्या दिवशी युतीकडून कोणीही उमेदवारी भरली नसल्याने ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. दरम्यान, सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही देण्याचा विचार करू, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.

हेही वाचा – नाशिकमधील पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार? भाजपा पाठिंबा देण्यास तयार, पण…

काँग्रेसच्या मतदारसंघात शिवसेना लढणार

नागपूर शिक्षक मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र, काँग्रेसने ही जागा सोडून शिवसेनेला दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या गटातर्फे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर, भाजपाकडून महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांना पाठिंबा देण्यात येणार आहे.

अमरावतीमध्ये रंतगदार लढत

अमरावती पदवीधर मतदारसंघही महाविकास आघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्याविरोधात युतीतील डॉ.रणजित पाटील लढणार आहे.

हेही वाचा – पदवीधर निवडणूक : काँग्रेसची नामुष्की करण्याचा फडणवीसांकडून करेक्ट कार्यक्रम?

कोकणात कोण कोणाविरोधात?

कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. तर, भाजपाने ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे.

औरंगाबादेत राष्ट्रवादी गड राखणार का?

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. राष्ट्रवादीकडून विक्रम काळे रिंगणात उतरले असून भाजपाकडून किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आले आहे.

हेही वाचा रात्रीस खेळ चाले… संपेल ना कधीही हा खेळ राजकारण्यांचा!

विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारी अर्ज

  • नाशिक पदवीधर…………………. २९
  • अमरावती पदवीधर……………….. ३४
  • कोकण शिक्षक……………………… १३
  • औरंगाबाद शिक्षक…………………  १५
  • नागपूर शिक्षक…………………….. २७