विधान परिषद पदवीधर – शिक्षक निवडणूक; अंतिम उमेदवार ठरले, अशी असेल लढत…

maharashtra teachers election 2022 graduates teacher seats nashik konkan aurangabad nashik amravati need to know details

राज्यात 30 जानेवारी होणाऱ्या विधानपरिषदेच्या शिक्षक पदवीधर निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण, औरंगाबाद या पाच जागांवर होणाऱ्या या निवडणुकीतील अंतिम उमेदवारांचे चित्र आज अखेर स्पष्ट झालं आहे. मात्र या निवडणुकीपूर्वी राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. यात नाशिक पदवीधर मतदार संघात कोणामध्ये अंतिम लढत होणार याकडे सर्वांच लागून होतं. यावरून बऱ्याच राजकीय चर्चाही रंगल्या. अखेर तीन वाजेपर्यंत ठाकरे गटाच्या नेत्या शुभांगी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. पण भाजपचे समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी माघार घेतली. यामुळे नाशिकमध्ये आता सत्यजित तांबेविरुद्ध शुभांगी पाटीलविरुद्ध सुभाष जंगले अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. नाशिकप्रमाणे इतर चार मतदार संघातही काय स्थिती आहे जाणून घेऊ..

नाशिक पदवीधर मतदारसंघ

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या काही तासांत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. कारण आज सकाळपासून ठाकरे गटाच्या नेत्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल होत्या. शुभांगी पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपकडून प्रयत्न झाले, यामुळे त्या खरचं अर्ज मागे घेतील असा अंदाज होता, मात्र हा अंदाज फेल ठरला. तर दुसरीकडे शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठींबा देण्याची मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केला, मात्र यावर ठाकरे गटाने कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे, शुभांगी पाटील आणि सुभाष जंगले यांच्यामध्ये तिहेरी लढत होईल. शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे एकूण 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

नागपूर शिक्षक मतदारसंघ

नागपूर शिक्षक मतदारसंघात अनेक नाट्यमय घटना पाहायला मिळाल्या. नागपूरमध्ये ठाकरे गटाने गंगाधर नाकाडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता नागपूरमध्ये भाजपचे आमदार नागो गाणार आणि काँग्रेसचे सुधाकर आडबोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार, शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांच्याच चौरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी त्यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने त्यांच्यावर पक्षाने कारवाई करत त्यांचे निलंबन केले आहे. नागपूर शिक्षक मतदार संघात एकूण 27 अर्ज आले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी आज उमेदवारी मागे घेतले त्यामुळे आता 22 उमेदवार रिंगणात आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघ

अमरावती मतदार संघात भाजप, मविआ, वंचित आणि आपचे उमेदवार रिंगणात आहेत. पण ही जागा आता महाविकास आघाडीमधील काँग्रेसने मिळवली आहे. यामुळे काँग्रेसकडून धीरज लिंगाडे आणि त्यांच्याविरोधात भाजपचे आमदार रणजीत पाटील अशी लढत होणार आहे. अमरावती पदवीधर निवडणुकीसाठी एका जागेसाठी 23 उमेदवार उभे आहेत. शेवटच्या दिवशी 10 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघ

कोकण शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शेकापचे नेते, विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यात आज अपक्ष उमेदवार वेणूनाथ कडू यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पाठींबा जाहीर केला आहे. वेणूनाथ यांच्या माघारीमुळे भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा मार्ग सुकर झाला आहे, पण मविआचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या मार्गात अडचणी आल्या आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 13 उमेदवारांपैकी 5 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. या मतदार संघावर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा विद्यमान आमदार विक्रम काळे यांनाच संधी दिली आहे. विक्रम काळे यांच्याविरोधात भाजपने काँग्रेसमधून आयात केलेले किरण पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे, मात्र काळे यांनी आधी दोन टर्म काम केल्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी फारशी अवघड नसेल असं म्हटलं जात आहे.


मेट्रो २ अ व मेट्रो ७ चा काऊंटडाऊन सुरु; गुरुवारी मोदींच्या हस्ते उद्घाटन