घरमहाराष्ट्रआमदार दत्तात्रय भरणेंनी फडणवीसांना करून दिली त्यांच्याच शब्दाची आठवण

आमदार दत्तात्रय भरणेंनी फडणवीसांना करून दिली त्यांच्याच शब्दाची आठवण

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत त्यांनी दिलेल्या शब्दांची आठवण करून दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर वीज बिल माफ करून महावितरणकडून शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबविण्यात यावी, अशी मागणी भरणेंनी केली आहे.

ज्या शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे बिल थकले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणकडून वीज तोडणी करण्याचे काम सध्या सुरु आहे. या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडीमधील माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा, असे भरणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच शेतक-यांचे वीज बिल माफ करण्याची मागणी देखील दत्तात्रय भरणे यांच्याकडून करण्यात आली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना देवेंद्र फडणवीस यांनी मध्यप्रदेशमध्ये असलेल्या भाजपच्या सरकारने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ केले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मविआ सरकारने देखील शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे आता राज्यात भाजपचे सरकार असल्याने फडणवीसांनी त्यांचा शब्द पाळावा आणि शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

यावेळी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, ‘फडणवीसांनी विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची मागणी केली होती. आता त्यांचे सरकार आहे. त्यावेळी त्यांनी दिलेला शब्द आता पाळावा. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करुन त्यांना दिलासा द्यावा.’ तसेच महावितरणकडून करण्यात येणारी शेतकऱ्यांची वीज तोडणी ताबडतोब थांबविण्यात यावी, अशी मागणी देखील भरणे यांच्याकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – ”महाराष्ट्राची सुटका झाली”; कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांसह विरोधकांकडून टीकेची झोड

- Advertisement -

दरम्यान, दत्तात्रय भरणे पुढे बोलताना म्हणाले की, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना आणि नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून गाळप झालेल्या उसाचे बील शेतकऱ्यांना देण्यास विलंब झाला आहे. पुणे जिल्हा बँक कधीही शेतकऱ्यांची अडवणूक करत नाही. नुकतेच तुम्हाला पुणे जिल्हा बँकेकडून 200 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. त्यामुळे आता विलंब न करता माझ्या शेतकऱ्याला व्याजासकट त्याचे बिल द्यावे. तसेच महाराष्ट्रातील कोणताही साखर कारखाना असा राहिला नाही की त्याने शेतकऱ्यांचे बिल दिले नाही. पण नीरा भीमा आणि कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याने ऊसाची बिल देण्यात उशीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टीचा निषेध करावा अशी ही गोष्ट असल्याचेही यावेळी दत्तात्रय भरणे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -