घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र१० लाखांची फसवणूक; डॉ. अपूर्व हिरेंसह चौघांवर गुन्हा

१० लाखांची फसवणूक; डॉ. अपूर्व हिरेंसह चौघांवर गुन्हा

Subscribe

नोकरीचे आमिष दाखवत घेतले होते १० लाख, उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

माजी आमदार डॉ. अपूर्व हिरेंसह चौघांनी पंचवटीतील हिरे महाविद्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत १० लाख रुपये घेऊन एका वयोवृद्धाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना १ जानेवारी २०१७ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत देवी मंदिराजवळ, वडनेर गेट, पाथर्डी रोडलगत, पिंपळगाव खांब येथे घडली. याप्रकरणी उत्तम काळू चौधरी (वय ६४) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित कल्पेश प्रभाकर बोरसे, दीपक झिप्रू चव्हाण, अमर रामराजे, डॉ. अपूर्व हिरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, भद्रकाली, नाशिकरोड पोलीस ठाण्यापाठोपाठ हिरे यांच्या विरोधात उपनगर पोलिसात फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार व फिर्यादी चौधरींच्या फिर्यादीनुसार, उत्तम चौधरी यांना नातेवाईक पोपट राजाराम कडभाने व कल्पेश बोरसे जानेवारी २०१७ मध्ये जेलरोड परिसरात भेटले. त्यावेळी बोरसे यांनी हिरे महाविद्यालय, पंचवटी कॉलेजमध्ये ओळख असून, तेथे जागा निघाल्या आहेत. तिथे तुमचा मुलगा दीपकचे काम करून देतो, असे सांगितले. त्यानंतर पुन्हा बोरसे १७ जानेवारी २०१७ मध्ये घरी आले. तुमचे काम करून देतो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, असे म्हणाले. फेब्रुवारी २०१७ मध्ये बोरसे घरी आले. माझ्यासोबत साहेबांकडे चला, असे सांगितले. त्यानुसार उत्तम चौधरी, दीपक चौधरी व पोपट कडभाने हे बोरसेंसोबत डॉ. अपूर्व हिरे यांच्या कार्यालयात गेलो. बोरसेंनी दीपक चव्हाण यांच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर चव्हाण यांनी डॉ. हिरेंना तिघांची ओळख करून दिली. दीपक चौधरींना संस्थेमध्ये नोकरी लावायची आहे, असे चव्हाण यांनी डॉ. हिरेंना सांगितले. त्यावेळी डॉ. हिरेंनी काम नक्की होईल, तुम्ही कागदपत्रे चव्हाण व बोरसेंकडे द्या, पैशाचे ते तुम्हाला सांगतील, असे सांगितले. त्यानंतर सर्वजण कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी दीपक झिप्रू चव्हाण यांनी तुमचे काम शंभर टक्के होईल, तुम्ही १० लाख रुपये द्या, पहिले अर्धे पैसे द्या, असे सांगितले. उत्तम चौधरींनी १० मार्च २०१७ रोजी १ लाख ८० हजार रुपयांचा धनादेश, दुसरा धनादेश १ लाख ८५ हजारांचा दिला. त्यानंतर १३ मार्च २०१७ रोजी राजदूत हॉटेलमध्ये १ लाख ३५ हजार रुपये बोरसे व चव्हाण यांना दिले. चौधरींनी कल्पेश बोरसेंकडे वेळोवेळी कामाबाबत विचारणा केली असता तुमचे काम होत आहे, तुमच्या कामातच आहे, असे सांगत दोन वर्षे सांगितले.

- Advertisement -

कल्पेश बोरसे ९ नोव्हेंबर २०१९ रोजी चौधरींच्या घरी आले आणि दीपक चौधरीचे नाव यादीमध्ये नवव्या क्रमांकावर असल्याचे दाखविले. तुमच्या मुलाचे काम झाले आहे, तुम्ही उर्वरित रक्कम दोन दिवसांत द्या, असे सांगितले. त्यानुसार चौधरींनी ११ नोव्हेंबर २०१९ रोजी कल्पेश बोरसे यास घरी बोलवून ५ लाख रुपये दिले. त्यानंतर चौधरींनी नोकरीबाबत विचारणा केली असता बोरसे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कोरोना कालावधी असल्याचे कारण सांगून बोरसे यांनी दोन वर्षे आश्वासने दिली. त्यातून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चौधरींनी बोरसेंकडे पैसे देण्याची मागणी केली असता ५ लाख लाखांचा धनादेश दिला. पण धनादेश बाऊन्स झाला. त्यानंतर चौधरींनी बोरसेंची भेट घेतली असता शिवीगाळ करत धमकी दिली. संशयित आरोपींची मोठमोठ्या ठिकाणी ओळखी असल्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली नसल्याचे उत्तम चौधरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी आणि तक्रारदारांना ओळखत नाही. त्यांना कधीही प्रत्यक्ष भेटलेलो नाही. या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन सविस्तर बोलू शकेल. यामध्ये मला विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. बदनामी करुन खोटे गुन्हे नोंदवून पुन्हा एकदा राजकीय हेतू साध्य करण्याचे कारस्थान सुरू आहे.
– डॉ. अपूर्व हिरे, समन्वयक,
महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -