नाशिक जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळे बंद

नाशिक : जिल्ह्याला पुढील चार दिवस हवामान विभागाने अतिवृष्टीचा दिलेला इशारा, दुगारवाडी येथे पर्यटक अडकून झालेली दुर्घटना या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी घेतला आहे. तसे आदेश वन विभाग आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी (दि. ८) दिली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधबा येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेलेले २३ पर्यटक पावसाचा जोर वाढल्याने तेथेच अडकून पडले. यापैकी एक पर्यटक वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल विभागाचे त्र्यंबकेश्वरमधील अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि वन विभागाच्या अधिकार्‍यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. पाच पर्यटक मदतीविनाच बाहेर सुखरूप आले असले तरी १८ पर्यटकांना मात्र रात्री दीडपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करून बाहेर काढण्यात आले. पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. त्यातच राज्यात ११ ऑगस्टपर्यंत सर्वत्र अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक

जिल्ह्यातही घाटमाथ्यावर ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे. त्यामुळे या काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता प्रशासनाने जिल्ह्यातील धोकेदायक पर्यटन स्थळांवर पर्यटनास बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सायंकाळी पोलीस, वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन बंदीबाबतचे आदेश दिले.