घरमहाराष्ट्रनाशिकऐतिहासिक घटनांचा साक्षीदार "धुमाळ पॉइंट"

ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार “धुमाळ पॉइंट”

Subscribe

नाशिकचा गौरवशाली इतिहास

शरीरसौंदर्यात नाकाचे जे स्थान असते ते नगररचनेत सुंदर कारंजे, उद्याने, प्रशस्त रस्ते व चौक यांचे असते. नाशिकमध्ये धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, उद्योगधंदे इत्यादी सर्वच दृष्टीने व अनेक संस्मरणीय घटनांचा क्रियाशील साक्षीदार असलेला शहराचा मध्यवर्ती चौक म्हणजे पूर्वीचा मेनरोड- धुमाळ पॉईंट चौक आहे. नगरसेवक व विधीज्ञ रा. ब. धुमाळे यांच्या वास्तव्यामुळे हत्तीखाना दक्षिण-उत्तर मेन रोड व चांदवडकर लेन हे रस्ते एकत्र येतात, त्या चौकास धुमाळ चौक किंवा पॉईंट या नावाने ओळखले जातेे.

नाशिकमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक सत्याग्रह या चौकात झाले. गोवामुक्ती आंदोलन, परदेशी मालाची होळी येथेच झाली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मिरवणूकीचा प्रारंभ याच चौकातून तर कवी कुसुमाग्रज यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी याच चौकातुन सत्याग्रह केला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ऐतिहासिक अधिवेशन नाशिकला झाले तेव्हा पुरूषोत्तमदास टंडन यांची मिरवणूक याच चौकातून पुढे सरसावली. गणेशोत्सव मिरवणूकीसाठी नाशिकच्या केंद्रस्थानी असलेला हा चौक आहे. नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राची अस्मिता असलेल्या लोकहितवादी मंडळाची कल्पना याच चौकातील आर्यवैभव प्रेसमध्ये तर आणि चित्रमंदिर थिएटरमध्ये आचार्य असे श्यामराव भोळे, सोपानदेव चौधरी यांची का विनोदी चर्चा तर बाळासाहेब काळे यांच्या पर स्टुडिओत नाट्यवाचन चर्चा यांचे आदानप्रदान होत असे. चौकातील डोंगरे गणपती मंदिरात भारतामधील नामवंत गायक शास्त्रीय संगीताची, तर नाशिकचे उदयोन्मुख कलावंत गायनाने हजेरी लावत असत. महत्त्वाची बाजारपेठ याच चौकात आहे. या चौकाने शास्त्री पंडितांची तर्ककर्कश चर्चा गंभीरपणे श्रवण केली.

- Advertisement -

हरिनामाचा गजर ऐकला, राजनीतीज्ञांचे मनसुबे उत्कटतेने ऐकले. अनेक देशभक्तांची व आंदोलनकर्त्यांची राजगुह्ये विश्वासाने उराशी बाळगली. गोळीबार, लाठीमाराने स्वातंत्र्य आंदोलन चिरडणार्‍या किंकाळ्या ऐकल्या. अत्याचार पाहिले. अनेक गुणी कलावंतांनी चौकात येऊन केलेली चर्चा ऐकली. नाशिकचे पहिले सत्याग्रही देशभक्त दादासाहेब गद्रे यांनी महात्मा गांधींच्या वधाच्या दिवशी याच चौकात बैठा शोकप्रस्ताव करणारा आक्रोश केला. तर स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंदोत्सवही या चौकात साजरा झाला.

१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात १४-१५ वर्षांच्या आठ-दहा विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन काढलेल्या मिरवणुकीवर याच चौकात लाठीमार झाला. या अमानुष हल्ल्यात विठ्ठल नागपुरे, संधान हे विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या स्मृतिप्रित्यर्थ नोव्हेंबर १९९५ मध्ये या स्मृती जागविण्यासाठी चौकाला धुमाळ चौकाऐवजी वंदे मातरम् चौक असे नाव नाशिक महापालिकेने दिले. वीर सावरकर पथ, महात्मा गांधी रस्ता व दक्षिण-उत्तर मेन रोडला गो.ह. देशपांडे या नाशिकच्या थोर देशभक्तांचे कृतज्ञ स्मरण म्हणून संगमावरील चौकास ’वंदे मातरम् चौक’ हे नाव नाशिककर नागरिकांच्या वतीने महापालिकेने दिले आहे. सर्वांनी याचे स्मरण ठेवणे अगत्याचे आहे.

- Advertisement -

नाशिक (शहर) च्या अस्तित्त्वाचा कालखंड अगदी पुरावा म्हणून समोर येतो, त्यानुसार सुमारे पाच हजार वर्षांचा मानला पाहिजे. रामायण काळ ५००० वर्षांचा व रामायणकाळात नाशिकचे अस्तित्त्व हा त्याचा सबळ पुरावा आहे. चार युगात नाशिक गाव निरनिराळ्या नावांनी ओळखले जात होते, अस्तित्त्वात होते व आहे. कृतयुगात गोदाक्षेत्र. भगवान शिव-विष्णू यांच्या वास्तव्याने हरिहर क्षेत्र. ब्रह्मदेवाने पद्मासन घालून केलेल्या तपश्चर्येमुळे पद्मनगर. त्रेतायुगात प्रभू श्रीराम व अगस्तीमुनीच्या भेटीमुळे जनस्थान. शूर्पणखेचे नाक कापल्यामुळे नाशिक किंवा नऊ टेकड्यांवर वसलेले गाव नवशिख – नाशिक या नावाने स्थिरावले असताना औरंगजेबाने काबीज केलेल्या प्रदेशात नाशिक घेतल्याने येथील गुलाब फुलांच्या उत्पादनामुळे ’गुलशनाबाद’ असे नाव दिले.

पुनश्च मराठ्यांच्या अंमलाखाली नाशिक हे नाव कायम राहिले आहे. दक्षिण काशी, धार्मिक व तीर्थक्षेत्र म्हणूनही गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. आपली प्राचीन परंपरा जोपासत हे गाव ग्रामसभा, नगरपालिका अशा स्थित्यंतरानंतर महापालिकेत रूपांतरित झाले. हजार-पाचशे वस्तीचे गाव, दहा हजार लोकवस्तीचे गाव१८६४ च्या प्रथम जनगणनेनुसार २२ हजार वस्तीचे झाले आणि आज १२ लाख लोकवस्तीचे महाराष्ट्रातील अग्रगण्य शहर म्हणून नावारूपाला आले आहे. या गावात १ मे १८६४ ला नगरपालिका अस्तित्त्वात आली. अत्यावश्यक नागरी सुविधा व दळणवळणासाठी कार्ल मार्कस् यांनी म्हंटल्याप्रमाणे मानवी मन हे भौतिक गरजेनुसार बनते, याचा प्रत्यय येतो. ब्रिटिश सरकारने २२ जून १८६५ ला आपल्या अधिकृत अहवालात खालीलप्रमाणे चतु:सीमा (२२ हजार लोकवस्तीसह) नमूद केल्या. पूर्वेस रायगीर गोसावी यांच्या मठापर्यंत रामकुंड, गणेशवाडी, नरसिंगपुर्‍यापर्यंत व महालक्ष्मीपर्यंत, पश्चिमेस खडकाळी फुलारमुसलमान लोकांच्या घरापर्यंत, मल्हार दरवाजाच्या ढोले-पाटील यांच्या वाड्याच्या जागेतील ढोल्या गणपतीपर्यंत, दक्षिणेस मोठ्या राजवाड्यापर्यंत, वाघाडीपर्यंत, गोदावरी नदीपर्यंत, उत्तरेस ओकांच्या बागेपर्यंत, भडक दरवाजापर्यंत आहे.

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -