जूनमध्येही मुक्या प्राण्यांची पाण्यासाठी काहिली

रोहित शेळके । नांदगाव

वैशाख संपून ज्येष्ठ आषाढ महिना लागला असताना देखिल उन्हाची तिव्रता कायम असल्याने मनुष्य प्राण्याबरोबरच वन्य प्राण्याची देखिल काहिली होत असल्याने वन्यप्राणी अन्न-पाण्याच्या शोधात शहराकडे धाव घेताना दिसत आहे. अन्न-पाण्याच्या शोधात आज एक-दोन नव्हे तर चक्क सात वानर शनिमंदिर चौकात अवतरल्याने काहीकाळ तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये धावपळ झाली. मात्र तेथे प्रितम कासलिवाल यांनी आपल्या घरासमोर पाण्याने भरून ठेवलेल्या ड्रमकडे वानर राजांचा मोर्चा पाणी पिण्यासाठी वळल्याने व पाणी पिऊ लागल्याने उपस्थितांच्या नजरा कुतूहलाने खिळल्या गेल्या

दिवसेंदिवस उन्हाच्या तडाख्याने वन्य प्राणी व पक्षी अन्न-पाण्याच्या शोधात नागरीवस्तीकडे फिरत असतात. त्यामुळे त्यांना अपघातही होऊन जीव गमवावा लागतो. सध्या नांदगाव तालुक्यात हरिण, काळवीट, मोर, वानर अन्न – पाण्याच्या शोधात सैरभैर फिरत आहे. तर काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील आमोदे येथील सतारी शिवारात दहा मोरांचा अन्न-पाण्याच्या शोधात दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली. वनपरिक्षेत्रात कृत्रीम पाणवठे तयार करणे किती गरजेचे आहे. यावरून दिसून येत असले तरी प्राणी मित्रांनी वनपरिक्षेत्रात कृत्रीम पाणवठे तयार करण्याची मागणी केली असताना देखील ढिम्म झालेल्या वन विभाग प्रशासनाला जाग येताना दिसत नाही. शुक्रवारी (दि. ३) भरदुपारी येथील नागरीवस्तीत एक-दोन नव्हेतर चक्क सात वानरांचा अन्न पाण्याच्या शोधात मोर्चा आल्याने तेथे असलेल्या नागरिकांमध्ये काहीवेळ धावपळ झाली. मात्र त्यानंतर नागरिकांनी वानरांना बिस्कीटे, फळे दिली असता जवळच पाण्याचा ड्रम वानरांना दिसल्याने वानर आपली तहान भागविण्यासाठी पाण्याच्या ड्रमजवळ येवून पाणी मनसोक्त पिऊन त्यांनी आपला मोर्चा दुसर्‍या भागाकडे वळवला. दरम्यान यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.