घरमहाराष्ट्रनाशिकटोलवर फास्ट टॅगचा झोल

टोलवर फास्ट टॅगचा झोल

Subscribe

चांदवड, लळींग (धुळे) टोलनाक्यांवर एकाच बाजूची दोनदा टोल वसुली

ओझर : पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर संगणक प्रणालीत बदल करून शासनाच्या खात्यात पैसे न जाता परस्पर टोलची रक्कम वळवण्याची घटना ताजी असतानाच टोलवरील झोलचा नवीन प्रकार समोर आला आहे. फास्टटॅग धारकांना पहिला टोल भरूनही पुन्हा दुसर्‍या नाक्यावर तेवढाच टोल आपोआप कापला जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघड झाला आहे.धुळ्यात व चांदवड येथे दोनदा टोल कापला जात असल्याने फास्टटॅगधारकांनी सावध होणे गरजेचे आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर ओझर ते धुळे दरम्यान असलेल्या चांदवड व लळींग (धुळे) टोल नाक्यावर फास्टटॅग असलेल्या वाहनाचा दोन्ही ठिकाणी एकाच बाजूची दोनदा टोलची रक्कम वसूल करुन लूट केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत ओझरचे रहिवाशी व एचएएलचे निवृत्त कर्मचारी बाळासाहेब वाघ यांना नुकताच अनुभव आला.

वाघ परिवारासह त्यांच्या कारने (एमएच १५-सीटी ७७७६) धुळे येथे गेले होते. धुळे येथून रविवारी ओझरला परत येतांना ८.११ वाजता धुळे येथील टोल नाक्यावर १४५ रुपये टोलची रक्कम फास्टटॅगमधून कापली गेली. आता नियमानुसार चांदवड टोल नाक्यावर टोल कापायला नको होता. मात्र रात्री ११.२५ ला चांदवड टोल नाक्यावरही पुन्हा १४५ रुपये कापले गेले. एकाच वाहनाला दोन ठिकाणी टोल कापला गेला. असे झाले तर २४ तासाच्या आत एका टोल नाक्यावरची रक्कम परत मिळणे अपेक्षित होते. परंतु ४८ तास उलटूनही जादाची कापली गेलेली रक्कम परत मिळालेली नाही. हा नवा प्रकार तर नाही ना?हा प्रकार फास्टटॅग लेनमधून येताना झाला आहे. कस्टमर केअरला फोन केला तर उत्तर मिळाले नाही. असे प्रकार अनेक वाहनांच्या बाबतीत होत असावेत अशी शंका वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

अनेक जणांकडे फास्टटॅगला दिलेला मोबाईल क्रमांक वेगळा असतो. कधी चालक वेगळा असेल तर त्याचा मेसेज मालकाला येतो, त्यामुळे चालकाला समजत नाही. तसेच अनेक जण बारकाईने नेमकी किती रक्कम कापली गेली किंवा कसे हे सातत्याने तपासतही नाही, त्यामुळे हाही झोलचा वेगळा प्रकार तर नाही ना अशी शंका खासगी वाहनचालक मालकांनी व्यक्त केली आहे.

वाहनचालकाने धुळे येथे जाताना व येताना चांदवड व धुळे या दोन्ही टोलनाक्यावर दोन्ही ठिकाणी टोलची रक्कम खात्यातून कापली गेली तर नाही ना? हे तपासून घ्यावे. टोलनाक्याच्या या झोलबाबत वरिष्ठांनी लक्ष घावे.बाळासाहेब वाघ, ओझर

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -