घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपालकांनी फी जमा केली मात्र शाळेत जमा झालीच नाही; सेंट फ्रान्सिस शाळेतील...

पालकांनी फी जमा केली मात्र शाळेत जमा झालीच नाही; सेंट फ्रान्सिस शाळेतील प्रकार

Subscribe

नाशिक :  सातत्याने विविध वादांमुळे चर्चेत राहणाऱ्या तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्सिस शाळा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. फी वाढीमुळे पालक आणि शाळा प्रशासन यांच्यातील संघर्ष नित्याचाच असताना आता विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शैक्षणिक शुल्क घेत दिलेल्या पावत्या परस्पर रद्द केल्याचा गंभीर प्रकार सेंट फ्रांसिस शाळेत घडला आहे. शाळेत कार्यरत दोन कर्मचार्‍यांनीच तब्बल १७ लाख ४० हजार ५२० रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी रणजित कौर दिलीपसिंग संधू यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात या फसवणुकीसंदर्भात तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित क्लार्क निशा सुधीर जगताप (वय ५३, रा. डीजीपी नगर, नाशिक) व दीपक दामोदर बंगेरा (३७, रा. इंदिरा नगर, नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दोघांनी संगनमत करत सेंट फ्रान्सिस शाळेमधून विद्यार्थ्यांच्या पालकांनी जमा केलेले शैक्षणिक शुल्क घेतले. त्या बदल्यात या दोघा संशयितांंनी पालकांना पावती दिली. त्यानंतर या पावत्या रद्द करून तब्बल १७ लाख ४० हजार ५२० रुपयांचा अपहार केला. आधीच बेसुमार फी वाढ आणि फी वसूलीसाठी पाल्यांना त्रास देणे असे प्रकार या शाळेत याआधी घडले आहेत. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहे. त्यामुळे शाळेच्या भूमिकेकडे लक्ष्य लागून आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मन्सुरी करीत आहेत.

दोघांचा शोध सुरू

सेंट फ्रान्सिस हायस्कूलमधील संशयित निशा सुधीर जगताप व दीपक दामोदर बंगेरा यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेतलेल्या शैक्षणिक शुल्काचा अपहार केला आहे. ते फरार असून, पोलीस त्यांच्या मागावर आहेत, असे तपासी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक मन्सुरी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -