घरमहाराष्ट्रनाशिकशहरात पावसाचे धूमशान, तासाभरात रस्ते तुंबले

शहरात पावसाचे धूमशान, तासाभरात रस्ते तुंबले

Subscribe

वाहतुकीचा उडाला फज्जा, पाच तासांत ३० मिलिमीटर पावसाची नोंद

नाशिक : गेल्या दहा-बारा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे गुरुवारी (दि.४) पुनरागमन झाले. सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने तासाभरातच शहरवासियांना अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांना अक्षरशः नाल्यांचे स्वरूप आले होते. या पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहतुकीचा पुर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र शहरात विविध ठिकाणी दिसून आले.

जून महिन्यात सुरूवातीला काहीशी हजेरी लावल्यानंतर दीर्घ विश्रांती घेतलेल्या मोसमी पावसाने राज्यात जुलैमध्ये सरासरी भरून काढली. नाशिक जिल्ह्यात तर आतापर्यंत ९३३ मिलीमीटर म्हणजेच ७२ टक्के पावसाची नोंद झाली असून, काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतीपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. या काळात धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदावरीला दोन वेळा पूरस्थितीही निर्माण झाली होती. मात्र, गेल्या १२ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. तापमानातही वाढ झाल्याने नाशिककरांना अक्षरशः उन्हाळ्याप्रमाणे उकाडा सहन करावा लागत होता. मात्र, गुरूवारी दुपारी ४ वाजेनंतर अचानक ढग दाटून आले आणि दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास धो-धो पावसाला सुरूवात झाली. सुमारे दीड तास चाललेल्या या पावसाने शहर परिसराला अक्षरशः झोडपून काढले.

- Advertisement -

तासाभर चाललेल्या या पावसाने शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. पहिल्या पावसाप्रमाणेच शहराच्या विविध भागांत पाणी साचले होते. शरणपूर रोडवरील महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोरील रस्त्यावरून चालताना तर रस्ता आहे की नदी असा काहीसा प्रश्न वाहनधारकांना पडला होता. हेच चित्र शहरातील विविध भागांतही दिसून आले. यामुळे या पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. पावसामुळे शहरात वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले. या पावसाने बाजारपेठेत खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गुरुवारी दुपारी साडेचार ते रात्री साडेआठ या पाच तासांत ३०.४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात ५७ मिलिमीटर पाऊस झाला. रात्रीही पावसाची रिमझिम सुरू होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -