स्वामी गोविंदानंद यांनीच महंत सुधीरदासांना केले उद्युक्त

नाशिक : द्वारका पीठाधीश्वर शंकराचार्य हे काँग्रेसचे असल्याचे महंत सुधीर पुजारी यांनी मंगळवारी झालेल्या शास्त्रार्थ सभेत म्हटले. त्यावरून स्वामी गोविंददास संतापले. यानंतर सुधीरदास पुजारी यांनी माफी मागावी असे गोविंदानंद यांनी वारंवार म्हटले आणि यावरून वाद शिगेला पोहोचला. गोविंदानंद यांनी वारंवार सुधीरदास पुजारी यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत अंगावर जाण्याचा प्रयत्न केल्यानेच सुधीरदास यांनी गोविंदानंद यांच्यावर माईक उगारल्याचे चित्र प्रत्यक्षदर्शींनी बघितले. महंत सुधीरदास यांची माईक उगारण्याची कृती समर्थन करण्यासारखी नसली तरी गोविंदानंद यांनी नाशिकच्या साधू-महंत आणि जाणकारांचा वारंवार ज्या पद्धतीने अपमान केला त्याचीच परिणीती माईक उगारण्याच्या कृतीत झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात गोविंददास यांना एका खोलीमध्ये बंद करण्यात आले. माफी मागितल्याशिवाय नाशिक सोडणार नाही, असे गोविंददास यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा वाद पुढील काही दिवस पेटत राहण्याची चिन्ह आहेत.

  • गोविंदानंद सरस्वती यांच्यासह नाशिकचे साधू महंत आणि अभ्यासक यांची एकत्रित शास्त्रार्थ सभेला सुरुवातच वादाने झाली. नाशिकमधील साधूमहंत जेव्हा महर्षी सिद्धपिठम याठिकाणी पोहचले त्यावेळी गोविंदादास हे सिंहासनावर बसले होते आणि त्यांनी नाशिकच्या साधू-महंतांना जमिनीवर बसण्याचा आदेश केला. येथूनच खर्‍या अर्थाने गोविंदादास यांनी नाशिकच्या साधू महंतांचा अपमान करायला आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर नाशिकचे साधू-महंत आणि उपस्थितांच्या दबावामुळे गोविंदादास सिंहासन त्यागून चर्चेसाठी खाली बसले.
  • चर्चा सुरू झाल्यानंतरही गोविंदानंदांनी संपूर्ण सभाच आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
    त्यांनी याआधीही मांडलेला वाल्मिक रामायणमधील संदर्भाचा पुरावा पुन्हा-पुन्हा सभेत मांडला. परंतु त्यावर नाशिकच्या साधूमहंत आणि अभ्यासकांनी त्यांचा आदर करून त्यांच्या पुराव्यांचा आदरपूर्वक स्वीकार केला.
    जेव्हा नाशिकचे साधूमहंत आणि अभ्यासक यांनी आपले पुरावे मांडण्यास सुरुवात केली तेव्हा गोविंदादास यांनी त्या पुराव्यांची थट्टा करण्यास आणि त्यात मुद्दाम अटी-शर्थी टाकण्यास सुरुवात केली. त्याहीउपर अपमानित करण्याचा सिलसिलाही सुरूच ठेवला.
  • गोदाप्रेमी आणि अभ्यासक देवांग जानी या सर्व भगवाधारी महानुभवांमध्ये वेगळे दिसत होते. महत्वाचे म्हणजे सर्वाधिक पुरावे तेच मांडत होते. असा सर्वसामान्य पेहरावातील माणूस बघून गोविंदादास यांनी जानी यांना टार्गेट करून त्यांची खिल्ली उडवणे, त्यांना अपमानित करणे, त्यांचे पुरावे फेकून देणे असे प्रकार केले. परंतु देवांग जानी यांनीही मुत्सद्दीपणा व नाशिकच्या संस्कृतीला उगाच गालबोल नको म्हणून ते शांत राहिले. गोविंदादास यांच्या ट्रॅपमध्ये ते फसले नाहीत.
  • यानंतर टार्गेट होण्याची वेळ होती. अंजनेरी येथील महंतांची, तापट स्वभावाचे म्हणून परिचित असलेले हे महंत काहीसे उशिराने आले. आल्याक्षणी गोविंदादासांनी त्यांना आप कोण है, यहाँ आपका क्या काम, आपका पक्ष क्या है वो बताईये, बाकी बात मत किजिए अशा शब्दांत आणि अतिशय तुच्छ उच्चार करत त्यांचाही अपमान करून त्यांनाही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.
  • अशाच पद्धतीने गोविंदादास सभा सुरू झाल्यापासूनच सर्व उपस्थितांना उकसवण्याचाच प्रयत्न करत होते. वारंवार मोठा आवाजात इतरांना दरडावून आणि त्वेषाने कटाक्ष टाकून इतरांना जणू धमकवण्याचाच प्रयत्न करत होते.

 

परंपरा विचारताच गोविंदानंद भांबावले

या सर्वाचा कळस तेव्हा झाला तेव्हा सर्व उपस्थितांनी गोविंददास यांना त्यांची साधू परंपरा विचारली. त्यावर गोविंदानंद काहीसे भांबावले व पुन्हा विषय फिरवण्याचा प्रयत्न करू लागले. त्याचवेळी द्वारकधीश शंकराचार्य वगैरे सांगण्यास सुरुवात केली. त्यावर महंत सुधीरदास म्हणाले की, ’हो ठीक आहे ते सगळं. माहिती आहे आम्हाला. त्या शंकरचार्यांकडे अनेक काँग्रेसवाले जातात. या एकमेव वक्तव्याचा फायदा घेत गोविंदानंदांनी चर्चेतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शंकराचार्य यांची माफी मागा असे सुधीरदास यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत त्यांच्या अंगावर गोविंदानंद यांनी धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावर उपस्थितांनी चर्चा निष्फळ ठरू नये या हेतूने गोविंदादास यांना रोखले. जागेवर बसल्यावरही गोविंदादास यांनी महंत सुधीरदास यांना उद्देशून अपमानजनक भाष्य सुरूच ठेवले. चार तासांपासून गोविंदादास यांच्या चाललेल्या दडपशाही आणि दादागिरीला कंटाळून महंत सुधीरदास यांनी एका वाहिनीचा माईक त्यांच्यावर उगारला. आपण मारण्याच्या हेतूने माईक उगारलाच नाही हे सुधीरदासांचे समर्थन न पटणारेच आहे. परंतु त्यांना अशी कृती करण्यास उद्युक्त करणार्‍या गोविंदानंदांना तरी निर्दोष कसे म्हणता येईल?