मविप्र निवडणुकीत एका जागी दोन-तीन इच्छुकांना आश्वासन; डोकेदुखी वाढणार

नाशिक : जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागून असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ‘हायहोल्टेज ड्रामा’ संपल्यानंतर आता उमेदवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी एका जागेसाठी दोन ते तीन इच्छुकांना तयारी करण्याचे आश्वासन दिल्यामुळे गोपाळकाल्याच्या दिवशी नाराजांचा विस्फोट होण्याची शक्यता आहे.

राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून मविप्र समाज शिक्षण संस्थेचा लौकिक सर्वज्ञात आहे. या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 28 तारखेला 14 ठिकाणच्या केंद्रांवर मतदान होईल. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन महिला उमेदवारांसह उपाध्यक्षपद निर्माण करण्यात आल्यामुळे एकूण जागांची संख्या 24 झाली आहे. यात तीन सेवक संचालकांचा समावेश होतो. त्यामुळे थेट सभासदांमधून 21 पदाधिकारी व संचालक निवडले जातील. संपूर्ण जिल्ह्यातील मतदार हे संस्थेचे कार्यक्षेत्र असल्यामुळे उमेदवाराला अवघ्या आठ ते दहा दिवसांमध्ये जिल्ह्याच्या मतदारांपर्यंत पोहोचणे अशक्य होते. त्यादृष्टीने बघितले तर पॅनलशिवाय उमेदवारीला फारसा वाव मिळत नसल्याने पॅनलच्या उमेदवारांमध्येच सरळ लढत रंगते.

सत्ताधारी गटाचा प्रगती पॅनल व विरोधकांचा परिवर्तन पॅनल यामध्ये निवडणूक रंगणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनी एका जागेसाठी दोन किंवा तीन इच्छुकांना तयारी करण्याचे आश्वासन दिले आहे. आपल्याला उमेदवारी मिळेल, या अपेक्षेपोटी इच्छुक उमेदवार जिल्ह्याभर प्रचार करत फिरत आहेत. त्यांची प्रचार यंत्रणा अहोरात्र फिरतीवर आहे. प्रत्येक तालुक्यातील गावा-गावांत मतदारांच्या घरोघरी पोहोचण्याचे प्रमुख आव्हान या नेत्यांसमोर आहे. इकडे उमेदवारीचा अंतिम झालेली नसली तरी ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा आत्तापासून जोरदार तयारी सुरु आहे. प्रचारासाठी फिरणार्‍या कार्यकर्त्यांना गाडी, त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च वाढत असल्याने उमेदवारी पदरात पडण्यापूर्वीच खर्चाचा आकडा वाढला आहे. ऐनवेळी आपल्याच पदरात उमेदवारी पडेल या अपेक्षेपोटी इच्छुकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. इच्छुकांच्या नाराजीचा फटका बसू नये, यासाठी दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी निवड समिती तयार केली असून त्यांनाच उमेदवार ठरवण्याचे अधिकार दिले आहेत. एका जागेसाठी दोन किंवा तीन इच्छुक असताना उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर नाराजीचा विस्फोट होण्याचा धोका वाढला आहे. त्याचा कुठल्या पॅनलला अधिक फटका बसतो, हे येत्या 19 ऑगस्ट रोजी दिसून येईल.

संपूर्ण जिल्हा एकच मतदारसंघ

मतदारांची संख्या 10 हजार 197 असली तरी संपूर्ण जिल्हा हा एकच मतदारसंघ असल्याने उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचताना दमच्छाक होते. नांदगावच्या उमेदवाराला इगतपुरीपर्यंत आणि सिन्नरच्या उमेदवाराला कळवण सुरगाण्यातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन दिवस लागतील. त्यामुळे प्रत्येक तालुक्यासाठी एक स्वतंत्र टीम तयार करुन त्यांच्यामार्फत प्रचार केला जात आहे. मतदारांची यादी घेवून कार्यकर्ते नेत्यांचा प्रचार करत आहेत.