मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार आणि आता भाजपवासी झालेल्या नवीन जिंदाल यांच्यावरील कोळशाचे डाग धुऊन निघाले आहेत. आतापर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले, त्या सगळ्यांना आता जिंदाल यांच्याच सतरंज्या उचलाव्या लागतील, अशी सणसणीत टीका ठाकरे गटाने केली आहे.
कोळसा घोटाळा प्रकरणातील आरोपी म्हणून नवीन जिंदाल यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली होती. मात्र, जिंदाल यांनी काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेत लगेचच भाजपात प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना भारतीय जनता पार्टीने निवडणुकीचं तिकीट दिले. यामुळे ठाकरे गटाने भाजपावर जोरदार टीका केली आहे.
भाजपा हा कोठ्यावरील पक्ष
जवळपास 2 लाख कोटींचा घोटाळा असलेल्या या प्रकरणातील आरोपीला प्रवेश दिल्याने ठाकरे गटाने भाजपाला ‘कोठ्यावरील पक्ष’ असं म्हटलं आहे. “भारतीय जनता पक्षाची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट होताना दिसत आहे. भ्रष्टाचाराविरोधातील त्यांच्या सर्व वल्गना पोकळ ठरल्या आहेत आणि भाजप हाच भ्रष्टाचारी टोळीचा म्होरक्या असल्याचे आता उघड झाले. राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असल्याचे जगजाहीर आहे. त्याप्रमाणे भाजप हा नामचीन भ्रष्टाचाऱ्यांचा शेवटचा अड्डा बनला आहे,” असं म्हणत ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल केला आहे. “कोळसा घोटाळ्यात ज्यांच्याविरोधात भाजपने रान उठवले ते नवीन जिंदाल काँग्रेस पक्षातून भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये शिरले आणि आता भाजपचे हरयाणातून लोकसभा उमेदवार ठरले. त्यांना उमेदवारी देऊन भाजपाने देशाची एक प्रकारे थट्टाच केली असल्याचे उद्धव गटाचे म्हणणे आहे.
हेही वाचा – Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर
जिंदाल यांच्या विरोधातील आंदोलनाचे काय?
“एका बाजूला तथाकथित मद्य घोटाळ्यावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक करून तुरुंगात टाकले आणि त्याच वेळी गाजलेल्या कोळसा घोटाळ्यातील आरोपी नवीन जिंदाल यांना भाजपने उमेदवारी दिली. नवीन जिंदाल हे तूर्तास जामिनावर बाहेर आहेत. जिंदाल यांच्यासोबत जे अन्य 13 आरोपी आहेत त्यात मधू कोडा यांचेही नाव आहे. झारखंडमध्ये ‘कोल ब्लॉक’ वाटपात जो भ्रष्टाचार झाला त्यात जिंदाल हे एक प्रमुख लाभार्थी आहेत. ईडीने त्यांच्यावर ‘मनी लाँडरिंग’ कायद्याने गुन्हा दाखल केला होता. आणि जिंदाल यांच्याविरुद्ध भारतीय जनता पक्षाने जोरदार मोहीम राबवली होती. जिंदाल यांना अटक करून तुरुंगात डांबावे यासाठी भाजपने जिंदाल यांच्या कार्यालयाबाहेर हल्लाबोल केला, घेराव घातला. त्या वेळी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. त्यात भाजपचे शंभरावर आंदोलक कार्यकर्ते जखमी झाले होते आणि हजारावर भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. जिंदाल यांच्या कार्यालयावर काळा रंग फेकण्यात आला होता. पोलीस तसेच भाजप आंदोलकांत झटापट झाली होती. या काळात जिंदाल यांच्या निवासस्थानी छापेमारी झाली. तेच जिंदाल आता भाजपमध्ये येऊन एकदम ‘स्वच्छ’ झाले; पण जिंदाल यांच्या विरोधात लाठ्याकाठ्या खाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या भावनांचा कोणी विचार केला आहे काय?” असा सवाल उद्धव गटाने ‘सामना’च्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.
हेही वाचा – Amol Kirtikar : शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स