घरताज्या घडामोडीHijab Row: हिजाबवरुन निर्माण झालेला वाद दुर्दैवी - अजित पवार

Hijab Row: हिजाबवरुन निर्माण झालेला वाद दुर्दैवी – अजित पवार

Subscribe

देशात किंवा कोणत्याही राज्यात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायचे असतात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे लोक आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे अधिकार दिले आहेत, ते अबाधित ठेवण्याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे, असे सांगतानाच कर्नाटकात हिजाबवरुन झालेली घटना दुर्दैवी असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.

कधीकधी दुर्दैवाने काही लोक अशा विषयांमधून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आज जग पुढे जात आहे. प्रगत देश आणखी प्रगत होत आहेत. आपल्या देशात तरुणांची एवढी मोठी फळी आहे. अशावेळी या तरुणाईचा वापर विकासासाठी कसा करता येईल, याचा विचार केला गेला पाहिजे, असा टोला पवार यांनी भाजपचे नाव न घेता लगावला. एखादा व्हिडिओ क्लिप व्हायरल केली जाते. मग त्यावरुन कुणी ट्विट करते, लगेच त्यावर काऊंटर ट्विट पडतात आणि मग त्यातून नको त्या विषयाला महत्त्व दिले जाते. सर्वांनीच समजंस भूमिका मांडून संयम ठेवला पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोरोना महामारी नियंत्रणात आणण्याचे उत्कृष्ट काम झाले. त्या कामाचे कौतुक माध्यमे, न्यायालय आणि विविध संस्थांनी देखील केले आहे. धारावीसारख्या भागात कोरोना नियंत्रणात आणण्याचे आव्हानात्मक काम केले. वेळेप्रसंगी धीर देऊन आणि कडक निर्बंध लावून नियंत्रण लावण्याचे काम केले. पण कधीकधी राजकीय भूमिकेतून कुणी टीका करतात. लोकशाही असल्यामुळे हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे, असा टोला पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला.

सर्वाधिक रेल्वे गुजरातमधून सुटल्या. तर राज्यातून किती सुटल्या याची सर्व माहिती समोर आहे. केंद्रानेच मजूरांसाठी रेल्वे पुरविल्या, मोफत धान्य दिले. त्याकाळात मजूरांनाच थांबायचे नव्हते. त्यामुळे मजूरांना मदत करण्यासाठी आपण अन्नछत्र चालविले, त्यांना एसटी बसेसची सुविधा दिली. लॉकडाऊनमध्ये मजूर उपाशीपोटी रस्त्याने चालत निघाले होते. त्यात गरोदर महिला होत्या. वृद्ध आणि लहान मुलेही होती. माणुसकीच्या नात्याने महाराष्ट्राने त्यांना मदत केली, असेही अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

अनेक महामंडळावरील नियुक्त्या बाकी आहेत. महिलांशी निगडीत असलेल्या महामंडळावर नियुक्ती जाहीर केली आहे. मात्र आता इतर महामंडळाच्या नियुक्त्या फार काळ प्रलंबित न ठेवता ते जाहीर करुन टाकाव्यात असे वैयक्तिक मत व्यक्त करताना काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांना याबाबत कळवले असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांना टोला

चंद्रकांत पाटील हे केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. त्यांनी राज्यात जबाबदार मंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांनी एखादे वक्तव्य करताना त्याबाबत पुरावे दिले पाहिजेत. चंद्रकांतदादांनी बेजबाबदार आणि बिनबुडाची वक्तव्ये करु नयेत. महाराष्ट्रात हेलिकॉप्टर घेऊन फिरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. कुठून कुठे जाणार याचीही माहिती द्यावी लागते. चंद्रकांत पाटील यांना ही वस्तुस्थिती माहीत आहे. तरीही ते अशी वक्तव्य करत आहेत. याला मराठीत ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, असे म्हणतात, असा टोला अजित पवार यांनी लगावला.


हेही वाचा – Karnataka Hijab Row-कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धार्मिक पोशाख नको- कर्नाटक हायकोर्ट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -