समर्पित प्रशासन असेल तरच शहरातील विकासाला वेग, मोदींकडून मुंबईत प्रचाराचे रणशिंग

Pm narendra modi mumbai visit on february 10 modi mumbai tour timetable live

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुंबईच्या बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानंतर मोदींच्या हस्ते विविध कामासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटनानंतर मोदींनी भाषणाला मराठी भाषेतून सुरूवात केली. यावेळी मोदींनी महाराष्ट्र, मुंबई, भारताची अर्थव्यवस्था आणि भविष्याबाबत मोठं वक्तव्य केलं. मुंबईच्या विकासाला गती देणार आहे. पहिल्यांदाच भारत मोठी स्वप्नं बघत असून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी गरीबीची चर्चा आणि जगाकडून मदत मागणं यावरच वेळ घालवला. आज प्रत्येकाला वाटतंय की, भारत समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहे. डबल इंजिन सरकारवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे देशाचा विकास होत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

२०१४ला १० ते ११ किमीची मेट्रो होती. परंतु डबल इंजिनचं सरकार आल्यानंतर वेगानं विकासाला सुरूवात झाली. रेल्वे स्टेशन देखील आता विमानतळांसारखी होऊ लागली आहेत. मुंबईच्या विकासासाठी पैशाची कमी नाही. विकासाचा पैसा योग्य ठिकाणी लागला तर फायदा होईल. शहरात समर्पित प्रशासन असेल तरच विकास वेगानं होतो. विकासाच्या पैशातून भ्रष्टाचार झाला तर पैसा बँकेतच पडून राहतो, मग त्याचा उपयोग काय?, भाजप कधीही विकासाच्या आड येत नाही. दिल्ली ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्र ते मुंबई एक सरकार पाहीजे. डबल इंजिनचं सरकार नव्हतं. तेव्हा कामात अनेक अडथळे निर्माण करण्यात आले, असं म्हणत नरेंद्र मोदींनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

आगामी वर्षात मुंबईचा कायापालट होईल. प्रत्येकासाठी मुंबईत राहणं सुविधेचं होईल. याशिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यांवरुन मुंबईत येणं-जाणं सुलभ होईल. कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास सगळ्या गोष्टी आता ट्रॅकवर येत आहेत. मी त्यासाठी शिंदे-फडणवीस यांना अभिनंदन करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

शिंदेंनी दावोसचा जो अनुभव सांगितला. तेच वातावरण आता जगात पाहायला मिळतंय. आधुनिक कनेक्टिव्हिटीवरही जोर दिला जात आहे. भारताबाबत जगभरात पॉझिटिव्हीटी पसरली आहे. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. पण अशातही भारत ८० कोटी लोकांना मोफत रेशन देतंय. देशात पायाभूत सुविधा वेगानं निर्माण होतायत. मुंबईकर त्रास सोसत राहिले, शहर विकासासाठी याचना करत राहिले, पण ही स्थिती मुंबईत आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कधीच होऊ शकत नाही. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यातील कामं मोठ्या प्रमाणात होत आहेत. मुंबईचा भविष्यात कायापालट करणं ही डबल इंजिन सरकारची जबाबदारी आहे, असं म्हणत मोदींनी मुंबईत प्रचाराचा नारळ फोडला.


हेही वाचा : ‘काहींना मेट्रोचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होऊ द्यायचं नव्हतं पण…’; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल