घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअंकशास्त्र हे शास्त्र असल्याचे सिध्द करा; अंनिसचे 'त्या' ईशान्येश्वर संस्थानला आवाहन

अंकशास्त्र हे शास्त्र असल्याचे सिध्द करा; अंनिसचे ‘त्या’ ईशान्येश्वर संस्थानला आवाहन

Subscribe

नाशिक : अंकाद्वारे भविष्य पाहणे हे शास्त्र आहे, हे सिध्द करा व एकवीस लाख रुपये जिंका’ असे आव्हान अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्यावतीने सिन्नरच्या ईशान्यश्वेर संस्थानला देण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नर येथील ईशान्यश्वेर मंदिरात दर्शन घेतले. यानंतर वादाला तोंड फुटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांना सोबत घेऊन ईशान्येश्वर मंदिरात भविष्य पाहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळाले. अशातच ईशान्येश्वर मंदिर संस्थाने या ठिकाणी कुंडली पाहिली जात नाही किंवा हात ही पाहिले जात नाही, असे स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकला.

अंनिस ईशान्येश्वर मंदिराचा हा दावा मान्य करत मंदिर प्रशासनाला आव्हान दिले आहे. अंनिसच्या मते अंकशास्त्रात कुंडली अथवा हात पाहिला जात नाही. त्यांनी ज्योतिष पाहत असल्याचा दावा खोडून काढला नाही. ते अंकशास्त्राच्या आधारे भविष्य पाहत नसेल तर तसा फलक त्यांनी मंदिरात लावावा व जनता फसवणूकीपासून दुर राहावी म्हणुन तसे हमीपत्र लिहून द्यावे. अन्यथा अंकशास्त्र हे शास्त्र असल्याचे सिध्द करावे. तसे केल्यास अंनिस जनतेतून मिळविलेले एकवीस लाख रुपये त्यांना बक्षीस देईल, असे आव्हान महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे. मुख्यमंत्री यांनी रुद्र पुजा करण्यास अंनिसचा विरोध नाही. भारतीय संविधानाने प्रत्येकास श्रद्धा व उपासनेचा आधिकार दिला आहे. मात्र मुंबईच्या महत्त्वाच्या बैठका रद्द करून व गोपनीयता राखत प्रोटोकॉल तोडून हा दौरा झाला. मुख्यमंत्र्यांना रुद्र पुजा करायची तर मुंबईला अथवा कुठेही करु शकत होते. मात्र ईशान्येश्वर मंदिरात केली. कारण अंकशास्त्राच्या आधारे भविष्य पाहुन हा तोडगा केला असावा, असा संशय अंनिस ने व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -