घरराजकारणRaigad News : आमदार गोगावलेंविरोधात थेट राष्ट्रपतींना पत्र

Raigad News : आमदार गोगावलेंविरोधात थेट राष्ट्रपतींना पत्र

Subscribe

महाड तालुक्यातील पिंपळवाडीचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यावर अनेक आरोप करत इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. येत्या जूनमध्ये सहकुटुंब गोगावलेंच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

महाड : शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यावर गंभीर आरोप करून इच्छामरणाची परवानगी मागणारे पत्र राष्ट्रपतींना पाठवल्याने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पत्र लिहिणारे कल्पेश पांगारे हे महाड तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच असून त्यांनी कुटुंबासह आमदार गोगावले यांच्या घरासमोर जूनमध्ये आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

पिंपळवाडी ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवल्यानंतर शिवसेना आमदार भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आपल्याला धमकी देण्याचे सत्र सुरू केल्याचा आरोप उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी केला आहे. यापूर्वी देखील वाळीत टाकण्याचा प्रकार घडला होता. याबाबत विविध स्तरावर तक्रारी केल्याचा दावा पांगारे यांनी केला. मात्र, या तक्रारींची दखल आमदारांच्या दबावामुळे घेतली जात नसल्याचा गंभीर आरोप पांगारे यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Teachers News : देशाचं भविष्य घडवणाऱ्या गुरुजींची अल्प वेतनावर गुजराण

याबाबत पत्रकार परिषद घेऊन पांगारे यांनी आरोपांचा सविस्तर पाढाच वाचला. पिंपळवाडी हे आमदार गोगावले यांचे मूळ गाव आहे. या गावामध्ये त्यांचे घर असले तरी ते तेथील मतदार नाहीत. मात्र ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये त्यांचा सतत हस्तक्षेप सुरू आहे. ग्रामपंचायतीतीतील बेकायदेशीर कामाविरोधात आवाज उठवल्याबद्दल 30 एप्रिल 2023 रोजी गोगावले यांच्या समर्थकांनी आपल्या कुटुंबाला गंभीर मारहाण केली आणि गावातील इतरांवर खोटे आरोप करत गुन्हा दाखल केला होता. हे एवढ्यावरच थांबले नाही तर जिवे मारण्याची धमकीदेखील दिली, असा आरोप पांगारे यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad District News : रायगड जिल्हात ‘जलजीवन’च्या ‘गारंटी’चे तीन तेरा

पिंळवाडीतून फक्त गोगावले यांनाच मतदान करायचे नाही तर वाळीत टाकू, अशी धमकी त्यांचे हस्तक घरोघर जाऊन देत आहेत. त्यात ते जीवे मारण्याचीही धमकी देत असल्याचा गंभीर आरोप पांगारे यांनी केला आहे. पांगारे हे तरुण आणि सुशिक्षित आहेत. त्यांना धमक्या आल्यामुळे त्यांनी धमक्यांना कंटाळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. याचा राग मनात धरून ग्रामस्थांना भडकावून उपसरपंचपदाचा राजीनामा मागण्यात आला, असा पांगारे यांचा आरोप आहे.

जे पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे मतदाराच नाहीत त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकारच काय, असा सवाल पांगारे यांनी उपस्थित केला आहे. म्हणूनच गोगावले यांच्या गुंडगिरीने मरण्यापेक्षा इच्छामरण द्यावे, अशी मागणी १६ मार्च रोजी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे केल्याचे पांगारे यांनी सांगितले. प्रशासन दबावाखाली असल्याने ते याबाबत कोणतीच कारवाई करत नाही. यापुढे जर कारवाई झाली नाही तर आपण जूनमध्ये गोगावले यांच्या घरासमोरच कुटुंबासह आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

गोगावलेंच्या धमकीचे पुरावे

पिंपळवाडी गावात रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे काम सुरू असताना जुन्याच विटा पुन्हा वापरण्यात आल्या. याची तक्रार केल्यानंतर तू तक्रार करणारा कोण, असा सवाल विचारून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. 24 मार्च 2024 रोजी पिंपळवाडीतील श्री गावदेवी मंदिरात ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये भरत गोगावले यांनी जीवे ठार मारण्याची धमकी देत उद्याच्या उद्या उपसरपंचपदाचा राजीनामा दे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, अशी धमकी दिली होती. याबाबतचे कॉल रेकॉर्ड आणि मोबाईल चित्रफीत, व्हाइस रेकॉर्ड आपल्याकडे आहे.

– कल्पेश वंदना बाबू पांगारे, उपसरपंच, पिंपळवाडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -