घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रग्रामीण पोलिस दलातील रणरागिनी अॅक्शनमोडवर; 23 दिवसांत केल्या 32 हातभट्टया उद्ध्वस्त

ग्रामीण पोलिस दलातील रणरागिनी अॅक्शनमोडवर; 23 दिवसांत केल्या 32 हातभट्टया उद्ध्वस्त

Subscribe

नाशिक : ग्रामीण पोलीस दलातील महिलांच्या पोलीस चार पथकांनी २३ दिवसांत जिल्ह्यातील तब्बल ३२ हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पोलिसांनी ११ लाख ९४ हजार १७० रुपयांची गावठी हातभट्टीची दारू, रसायन व साहित्य साधने जप्त केली आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या हातभट्टी व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी महिला पोलीसांची ०४ पथके गठीत केली आहेत. प्रत्येक पथकात आठ महिलांचा समावेश करण्यात आला होता. जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्टपासून ग्रामीण पोलीसांच्या या महिला अंमलदार हातभट्टी व्यवसायांच्या निर्मूलनासाठी पुढे सरसावल्या होत्या. गेल्या तीन आठवड्यात महिला पोलिसांनी जिल्हयातील डोंगरातील छुपे हातभट्टीचे अड्डे शोधून एकूण ३२ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.

- Advertisement -

ग्रामीण पोलीसांच्या महिलांनी केलेल्या या कार्यवाहीत एकूण ३३ आरोपीतांविरुद्ध मुंबई दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी एकूण ११ लाख ९४ हजार १७० रुपयांची गावठी हातभट्टीची दारू, रसायन व साहित्य साधने हस्तगत करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या महिला अंमलदारांच्या कारवाईचे ग्रामीण भागातील महिलांकडून स्वागत होत असून, अशा महिला भगिनी देखील ग्रामीण पोलीसांना कारवाईकामी सहकार्य करत आहेत.

जिल्ह्यात सुरू असलेल्या हातभट्टी व्यवसायांच्या निर्मूलनासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांची महिला पथके यापुढेही कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यातील पोलीस पाटलांना त्यांना आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना अवैध व्यवसायाविषयी काही माहिती असल्यास त्यांनी ती नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायास प्रतिबंध घालण्याकामी सुरू केलेल्या हेल्पलाईन क्रमांक ६२६२ २५६३६३ यावर देऊन महिला अंमलदारांच्या कामगिरीस हातभार लावावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -