घरमहाराष्ट्रनाशिकपाटबंधारेच्या परवानगीविनाच विल्होळी धरणालगत रिसॉर्ट

पाटबंधारेच्या परवानगीविनाच विल्होळी धरणालगत रिसॉर्ट

Subscribe

भूमाफियांचा आणखी एक कारनामा उघडकीस

नाशिक : माजी सरपंच बाजीराव गायकवाड यांचे भूखंड घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच विल्होळी येथे भूमाफियांचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. स्वप्नील सराफ नावाच्या बिल्डरने कायद्याची तमा न बाळगता शासनाच्या नाकावर टिच्चून विल्होळी धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रशस्त असे व्यवसायिक रिसॉर्ट बांधले आहे. या बांधकामासाठी पाटबंधारे विभागाची कुठलीही परवानगी किंवा ना हरकत दाखला घेतला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशाप्रकारे विनापरवाना रिसॉर्ट बांधून सराफ यांनी एक प्रकारे शासनालाच आव्हान दिले आहे . दरम्यान पाटबंधारे विभागाचा नाहरकत दाखला नसतानाही प्रदेश विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) ने परवानगी दिलीच कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे.

धरणालगतच्या बांधकामाविषयी स्थानिक पातळीवरील नाहरकत दाखले आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करून परवानग्या दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे. कागदी सोपस्कर पार पाडणार्‍या एनएमआरडीएचे अधिकारी स्थळ निरीक्षण न करताच परवानग्या देत असल्याचे सराफ यांच्या प्रकरणावरून अधोरेखित होत आहे. धरण क्षेत्रामध्ये एवढे मोठे बांधकाम होत असताना पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी धृतराष्ट्राची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नाशिक शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विल्होळी गावात महामार्गालगत छोटे धरण आहे. परिसरातील आंबेबहुला, सारूळ आणि वील्होळी येथील शेतकरी शेतीसाठी या धरणाच्या पाण्याचा वापर करतात. छोटे धरण असले तरी त्याची व्याप्ती मोठी आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात स्वप्निल सराफ यांच्या मालकीचे गट नंबर ८९/3 /अ पैकी १३३००चौ.मी क्षेत्र आहे. उर्वरित ८९/४ पैकी , ५६०० चौ.मी,८९/६ मधील ४००० चौ.मी या क्षेत्रांचा विकसन करारनामा केला आहे. अशा एकूण २२९०० चौ.मी क्षेत्रात प्रशस्त असे रिसॉर्टचे बांधकाम केले आहे. महामार्ग सुविधांअंतर्गत वे-साईड मोटेल या वाणिज्य प्रयोजनार्थ एन. एम.आर. डी. ए. ने परवानगी दिली आहे. पावसाळ्यामध्ये या क्षेत्रात धरणाचे पाणी असायचे असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.या जमिनी पूर्वी आदिवासी शेतकर्‍यांच्या मालकीच्या होत्या. मात्र या जमिनी काही धनदांडग्यांनी स्थानिक महसूल अधिकार्‍यांवर दबाव टाकून त्या खालसा करून घेतल्याचे याच गटातील काही आदिवासी शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

याप्रकरणी सराफ यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच जमिनीवर धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात रिसॉर्ट बांधण्यात आले आहे. या रिसॉर्ट च्या बांधकामासाठी असलेल्या अटी व शर्तींचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. धरणाचे पाणी अडविण्यासाठी मोठी संरक्षण भिंत तयार करण्यात आली असून त्यामुळे एक बाजूने धरणाचा काही भाग बंदिस्त झाला आहे. त्यामुळे विरुद्ध दिशेला म्हणजेच गावाच्या बाजूने धरणाचा फुगवटा होत असल्याने वील्होळी गावाला धरणाच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे.इतक्या मोठ्या बांधकामासाठी स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत तसेच पाटबंधारे विभागाचा ना हरकत दाखला घेणे गरजेचे असतानाही सराफ यांनी कुठलाही ना हरकत दाखला न घेताच बांधकाम केल्याने सराफ यांना कुणाचा वरदहस्त लाभला आहे याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित होत असून धरण महत्त्वाचे की सराफ यांचे रिसोर्ट हे शासकीय यंत्रणेने स्पष्ट करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

विल्होळी येथील धरणावर स्वप्नील सराफ यांनी बांधलेल्या रिसॉर्ट साठी पाटबंधारे विभागाकडून कुठलाही दाखला देण्यात आलेला नाही. रिसॉर्टचे बांधकाम धरणक्षेत्रात आहे का याची तपासणी करण्यासाठी सराफ यांना जमिनीची शासकीय मोजणी करावी आणि पाटबंधारे विभागाची खात्री करून द्यावी असे पत्र दिले आहे. – अरुण निकम, उपअभियंता पाटबंधारे विभाग नाशिक

विल्होळी येथील रिसॉर्ट साठी पाटबंधारे विभागाचा ना हरकत दाखला घेण्यात आला आहे सर्व बांधकाम कायदेशीर पद्धतीनेच केले आहे. – स्वप्निल सराफ, रिसॉर्ट मालक, बांधकाम व्यावसायिक, नाशिक

स्वप्नील सराफ यांच्या रिसॉर्टच्या बांधकामाच्या परवानगी बाबतची संपूर्ण फाईल तपासली असता पाटबंधारे विभागाची परवानगी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. – प्रसाद देवरे, सहाय्यक नगर रचनाकार महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिक

विल्होळी येथील धरणालगत असलेल्या रिसॉर्ट साठी ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. – सुनील निकम, ग्रामसेवक , विल्होळी ग्रामपंचायत

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -