१६ आमदारांच्या पात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे; पाच न्यायाधीशांचे एकमत

 

नवी दिल्लीः शिवसेनेतून फुटलेले १६ आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. या १६ आमदारांमध्ये पहिले नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. हा निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना वेळेचे बंधन दिलेले नाही. त्यामुळे विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे केव्हा यावरचा निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शाह, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. आर. नरसिम्हा यांच्या घटनापीठाने हा निकाल गुरुवारी दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निकाल वाचन केले. सुमारे ३५ मिनिटे न्यायालयाने निकाल वाचन केले. यामध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केला.

 

अपात्रतेची टांगती असलेले आमदार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – कोपरी ठाणे
यामिनी जाधव – भायखळा
लता सोनावणे – चोपडा जळगाव
अब्दुल सत्तार – सिल्लोड – कृषी मंत्री
तानाजी सावंत – भूम/परंडा – आरोग्यमंत्री
संदीपान भुमरे – पैठण – रोजगार हमी, फलोत्पादन
भरत गोगावले – महाड
संजय शिरसाट – छ६पती संभाजीनगर (पश्चिम)
प्रकाश सुर्वे – मागाठाणे
बालाजी किणीकर- अंबरनाथ
बालाजी कल्याणकर – नांदेड
अनिल बाबर – खानापूर
संजय रायमुलकर – मेहकर लोणार – नांदेड
रमेश बोरनारे – औरंगाबादच्या वैजापूर
महेश शिंदे – कोरेगावचे
चिमणराव पाटील पारोळा एरंडोल, जळगाव

 

या आहेत सहा याचिका

पहिली याचिका ठाकरे गटाचे आमदार सुभाष देसाई यांची आहे. या याचिकेत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रधान सचिव यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

दुसरी याचिका मुख्यमंत्री एकनाथ संभाजीराव शिंदे यांची आहे. या याचिकेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

तिसरी याचिका शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केली आहे. या याचिकेतही विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

चौथी याचिका ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे. या याचिकेत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रधान सचिव यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

पाचवी याचिका ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचीच आहे. या याचिकेत विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व अन्य यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

सहावी याचिकाही ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचीच आहे. या याचिकेत विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.