घरताज्या घडामोडीकालचा शिवतिर्थावरचा भोंगा भाजपचा होता, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

कालचा शिवतिर्थावरचा भोंगा भाजपचा होता, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल, शनिवारी झालेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘कालचा शिवतिर्थावरचा भोंगा भाजपचा होता. सर्व भाजपची स्क्रीप्ट होती. तसेच टाळ्याही त्यांच्या होत्या आणि घोषणा देखील त्यांच्या होत्या.’

‘अक्कल दाढ उशिरा कशी येते?’

राज ठाकरे काल म्हणाले होते की, ‘2019च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंनी अचानक अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची टूम काढली. कारण त्यांना माहिती पडलं की, आपल्यामुळे सरकार अडतंय. हीच संधी उद्धव ठाकरेंनी साधली.’ यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘आता आम्हाला थोडासा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल की अक्कल दाढ इतक्या उशिरा कशी येते? भारतीय जनता पार्टी आणि आमच्यात काय झाले ते आम्ही बघून घेऊ, तिसऱ्याची आम्हाला जरुरत नाही. आमच्यात जे काही झालं ते आम्ही बघून घेऊ, तुम्ही यात पडायची गरज नाही. भारतीय जनता पार्टीचा लाऊडस्पीकर काल शिवाजीपार्कात वाजत होता, स्क्रिप्ट त्यांची होती, टाळ्या त्यांच्या होत्या आणि घोषणा देखील त्यांच्या होत्या.’

- Advertisement -

‘कालच्या टाळ्या देखील स्पॉन्सर्ड’ 

‘काल मराठी भाषा भवनाचे उद्घाटन झाले, मेट्रोचे उद्घाटन झाले म्हणजे मुख्यमंत्री काम करत आहेत नेतृत्व करत आहेत. त्याच्यावर बोला, तुमच्या भोंग्याचे काय करायचे, यांच्या भोंग्याचे काय करायचे, त्यासाठी सरकार समर्थ आहे. शरद पवारांनी जातीवाद पसरवला म्हणे. त्याच शरद पवारांच्या चरणात आपण देखील जात होतात, सल्लामसलत करण्यासाठी, कशा करता आपण टोलेजंग माणसांवर बोलायचं? एवढ्या मोठ्या टाळ्या मिळतात, त्या टाळ्या देखील स्पॉन्सर्ड आहेत. काल शिवतीर्थावरचा भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता. महाराष्ट्राला एकच कळलं की, अक्कलदाढ उशिरा येते,’ असे संजय राऊत म्हणाले.

‘भाजपने त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढली’

पुढे राऊत म्हणाले की, ‘देशात असे अनेक वेळा होते, शेवटी बहूमत तयार होते, त्याचवेळी सरकार बनते, युतीचे बहुमत झाले नाही. महाविकास आघाडीचे बहुमत झाले, आम्ही खोटं बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार बनवले आहे. काल त्यांनी मराठी भाषा भवनाचे स्वागत करायला हवे होते, त्याविषयी काही बोलले नाहीत, फक्त टीका करायची. भारतीय जनता पक्षाने त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढली, हे आता स्पष्ट दिसते आहे. आमचा दृष्टिकोन विकासाचा आहे, राज्यांवर जी संकट येत आहेत त्यांच्याशी लढा द्यायचा आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या घुसखोरी आणि अतिक्रमणाच्या विरोधात लढा द्यायचा आहे आणि हे करत असताना शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्रावर फडकवायचा आहे. अशा गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, बीजेपी शासित किती राज्यांमध्ये अजान बंद केली आहेत?’

- Advertisement -

हेही वाचा – Raj Thackerayच्या टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘एखादं व्याख्यान देऊन पुन्हा ३-४ महिने गायब’


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -