घरमहाराष्ट्रबुटेल ट्रेनसाठी पैसे आहेत; मग किल्ल्यांसाठी का नाहीत?

बुटेल ट्रेनसाठी पैसे आहेत; मग किल्ल्यांसाठी का नाहीत?

Subscribe

 छ. युवराज संभाजी राजे यांचा सरकारला सवाल

रिमझिम पाऊस, मधूनच उठणारे धुके, अशा आल्हाददायी वातावरणात किल्ले रायगडावर गुरुवारी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा अभूतपूर्व सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी संपूर्ण देशभरातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगडावर एकच गर्दी केली होती. यावेळी शिवभक्तांच्या शिवगर्जनेने रायगड दुमदुमून गेला. राज्यात सुराज्य निर्माण व्हावे ही छ. शिवाजी महाराजांची संकल्पना होती. मात्र सध्या राज्यात दुष्काळ पडलेला आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव नाही, शेतकरी कर्जात बुडाल्याने आत्महत्या करत आहेत. अशा वेळी छ. शिवाजी महाराजांचे नाव केवळ राजकीय फायद्यासाठी घेतले जावू नये. रायगड संवर्धन हे आपले ध्येय असून पुढील दोन वर्षात हातात घेतलेली कामे पूर्ण होतील. एकीकडे शासनाला बुलेट ट्रेनसारख्या उपक्रमांना पैसे उभे करता येतात, मग गड किल्ल्यांसाठी का करता येत नाहीत असा सवाल छ. युवराज संभाजीराजे यांनी केले.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या मार्फत गेली अनेक वर्षे किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावर्षीदेखील मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. दरवर्षापेक्षा यावर्षी किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती. किल्ले रायगडचा पायरी मार्ग, रायगड रोप वे यामुळे शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. देशभरातून आलेल्या शिवभक्तांच्या तोंडून छ. शिवाजी महाराज की जय हा एकच नारा दिला जात असल्याने परिसर दुमदुमून गेला. जिकडे तिकडे हातात घेतलेले भगवे झेंडे, फेटे बांधलेले शिवभक्त दिसून येत होते. पहाटेच या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरवात झाली. गडावर वाजणारे ढोल ताशे, हलगीवर खेळले जाणारे मर्दानी खेळ, गोंधळ, शाहिरी पोवाड्यांनी संपूर्ण आसमंत निनादून गेला. शाहिरांच्या या पोवाड्यांना उपस्थित शिवभक्तांनी उठून दाद दिली. यामुळे गडावर जणू शिवकाल अवतरला होता. यावेळी छ. शिवाजी महाराज यांची पालखी वाजत गाजत राजसदर येथे आणण्यात आली. राजसदरेवर छ. युवराज संभाजी राजे आणि त्यांचे पुत्र शहाजी राजे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. कोल्हापूर हायकर्स यांच्या वतीने आणण्यात आलालेल्या पंच जल कुंभातील पाणी आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. छ. संभाजी राजे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. यावेळी शिवभक्तांनी छ. शिवरायांचा एकच जयघोष केला. विशेष म्हणजे या सोहळ्याला चीन, बल्गेरिया, पोलंड, ट्युनेशिया या चार देशांचे राजदूत उपस्थित होते. उस्मानाबादमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला राजसदरेवर अभिषेक करताना युवराज संभाजी राजे यांनी शेजारी बसवून त्यांचा सन्मान केला.

- Advertisement -

यावेळी राजसदरेवर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, चार देशांचे राजदूत, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, राष्ट्रसेवा समूह या संस्थेचे अध्यक्ष राहुल पोकळे, निवृत्त कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात छ. युवराज संभाजी राजे यांनी ज्या मातीला छ. शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला आहे, त्या भूमीत त्यांचा वंशज म्हणून काम करताना अभिमान वाटतो. मी आज जो कोणी आहे तो केवळ छ. शिवरायांमुळे आणि या रायगडामुळे आहे असे स्पष्ट करत राज्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षात उपाययोजना झालेल्या नाहीत. याठिकाणी संत्री, द्राक्ष आदी फळ पिक मोठ्या प्रमाणात उत्पादित होत असले तरी ते आयात करावे लागते. हे दुर्दैव असून यापुढे शेतकर्‍यांसाठी काम करणार असल्याचे युवराज संभाजी राजे यांनी स्पष्ट केले.

खा.उदयनराजे भोसले आले आणि लगेच गेले

छ. शिवाजी महाराज यांचे वशंज सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवराज्याभिषेक दिनी किल्ले रायगडाला अचानक भेट दिली. उदयनराजे यांनी राजसदरेवर जावून छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आशीर्वाद घेतले. त्यांनतर त्यांनी लगेचच रायगड किल्ला सोडला. कोल्हापूरचे युवराज संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली साजरा होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्यास मात्र ते उपस्थित राहिले नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -