विधान परिषदेचे चित्र उद्या स्पष्ट होणार; अर्ज माघारीचा शेवटचा दिवस

पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपकडे पुरेशी मते नसताना भाजपने खोत यांची उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला तर विधान परिषद निवडणुकीत दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे.

राज्यसभा निवडणूक निकालानंतर आता राजकीय वर्तुळाचे लक्ष विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लागले असून या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या सोमवारी संपत आहे. ही मुदत संपल्यानंतर विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. (The picture of the Legislative Council will be clear tomorrow)

राज्यसभा निवडणुकीतील विजयाने विरोधी पक्ष भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे भाजपकडून अधिकृत पाच उमेदवारासह पुरस्कृत उमेदवार सदाभाऊ खोत यांचा अर्ज कायम राखला जाण्याची अटकळ बांधली जात आहे. मात्र, पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपकडे पुरेशी मते नसताना भाजपने खोत यांची उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला तर विधान परिषद निवडणुकीत दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे.

विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत भाजपने पाच उमेदवारांच्या व्यतिरिक्त माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेच्या आखाड्यात उतरविले आहे. शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीने अधिकृत दोन उमेदवारांसह एक अतिरिक्त अर्ज भरला आहे. त्यामुळे १० जागांसाठी १३ अर्ज असून सोमवारी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांचा अर्ज मागे घेतला जाऊ शकतो.

भाजपने राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला अस्मान दाखविले. या विजयामुळे विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पारडे जड मानले जात आहे. भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची बेगमी करावी लागणार आहे. असे असताना भाजपने खोत यांची उमेदवारी कायम ठेवली तर निवडणूक अत्यंत चुरशीची होईल. विधान परिषद निवडणुकीतील मतदान गुप्त असते. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीचे मतदान लक्षात विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होऊन त्याचा फटका सत्ताधारी आघाडीला बसू शकतो.

छोटे पक्ष आणि अपक्षांना महत्व

राज्यसभेच्या सहाव्या जागेचा विजय छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांनी निश्चित केला. राज्यसभा निवडणुकीत त्यांचे मतदान निर्णायक ठरले. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक घ्यावी लागली तर छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मतांचे महत्व अतोनात वाढणार आहे. निवडणूक अटळ असल्याचे गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांनी मतांची बेगमी करायला सुरुवात केली आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल अर्ज

भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड आणि पुरस्कृत सदाभाऊ खोत

राष्ट्रवादी काँग्रेस : रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवाजीराव गर्जे

शिवसेना: सचिन अहिर, आमशा पाडवी

काँग्रेस : चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप