घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राची माती तुडवली जात आहे... जितेंद्र आव्हाडांचा संताप आणि उद्विग्नता

महाराष्ट्राची माती तुडवली जात आहे… जितेंद्र आव्हाडांचा संताप आणि उद्विग्नता

Subscribe

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहून पाचवेळा औरंगझेबची माफी मागितली होती, असे वक्तव्य भाजपाचे खासदार सुधांशू त्रिवेदी केले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची माती तुडवली जात आहे. पण तरीही येथे बोलायला माणसे नसतील तर कठीण आहे, अशी उद्विग्नताही त्यांनी व्यक्त केली आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भाजपचे प्रवक्ते खासदार सुधांशू त्रिवेदी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबाबत खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रे लिहिली होती. त्या काळात अनेक लोक राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी माफीनामा लिहित असत.’ त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी काल सायंकाळी ट्वीट करत, असा म्हणणारा ठार वेडाच असू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

तर, आज टीव्ही9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना आव्हाड म्हणाले, यांच्या बापाने यांना असा इतिहास शिकवला आहे का? शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एकच पुरंदरचा तह झाला. मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर तो झाला होता. या तहानुसार ते औरंगझेबच्या दरबारात गेले होते. तेथे त्यांचा अपमान झाला. तो सहन न झाल्यामुळे तहात जेवढे किल्ले गेले होते, त्यापेक्षा दुप्पट किल्ले शिवाजी महाराजांनी औरंगझेबाकडून घेतले होते, असे त्यांनी अधोरेखित केले.

महाराष्ट्राची माती तुडवली जात आहे. लाथाडली जात आहे. असे असताना येथे बोलायला माणसे नसतील तर कठीण आहे, असे सांगून ते म्हणाले की, हर हर महादेव या चित्रपटातील इतिहास खोटा आहे, असे खुद्द बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांचे म्हणणे आहे. तरीही राज्य शासन ढिम्म आहे. राज्यात आता सर्वकाही चालत आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -