…हे खूप काही सांगून जाणारं आहे, पुणे दौऱ्यावरून रोहित पवारांचा अमित शाहांना टोला

rohit pawar
rohit pawar

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते अमित शाह हे गेले दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. काल (शनिवार) आणि आज (रविवार) त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन कार्यक्रम झाले. विशेष म्हणजे, पुढच्या रविवारी पुण्यातील दोन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे, मात्र यासाठी त्यांनी प्रचारात सहभाग घेतला नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ‘हे खूप काही सांगून जाणारं आहे,’ असे ट्वीट करून कोपरखळी मारली आहे.

अमित शाह यांचे काल, शनिवारी पुणे विमानतळावरआगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर एका कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणाऱ्या ‘मोदी @ 20’ या पुस्तकाच्या मराठी अवृत्तीचे प्रकाशन अमित शाहा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आज, रविवारी दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. मात्र पुण्यात येऊनही त्यांनी कसबा पेठ आणि चिंचवड येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात त्यांनी सहभाग घेतला नाही. तसेच, त्याबद्दल कुठलेही भाष्य केले नाही.

यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नेमकेपणाने बोट ठेवले आहे. अत्यंत अचूक अंदाज बांधणारे, सूक्ष्म रणनीतीकार, निवडणूक नियोजनातले निष्णात व्यक्तिमत्त्व म्हणजे अमित शाह. पुण्यात येऊनही त्यांनी कसबा पेठ आणि चिंचवडला प्रचार करणे टाळले, हे खूप काही सांगून जाणारे आहे, असे सांगतानाच, कदाचित प्रदेश भाजपविरोधातील असंतोष आणि संभाव्य ‘निकाल’ त्यांनीही हेरला असावा, अशी कोपरखळीही त्यांनी मारली आहे. या दोन्ही जागांसाठी 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होणार आहे.