मी पुन्हा येईन.., ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र भाजपकडून ट्विट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं होतं. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणी सिद्ध करण्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. तसेच उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हे पत्राला स्थगिती मिळावी म्हणून ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टात धाव देखील घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने उद्या बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. फटाके वाजवून आणि पेढे वाटून भाजपकडून जल्लोष करण्यात आला. सोशल मीडियावर मी पुन्हा येईन ….. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी! असे ट्वीट महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आलं आहे.

सोमय्यांचा ठाकरेंना टोला

उद्या महाराष्ट्राच्या जनतेची उद्धव ठाकरे यांचा माफिया सरकारपासून मुक्तता होणार, असे ट्वीट भाजप नेते सोमय्या यांनी केले आहे.

 सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया…

ऑक्टोबर 2019 ला जर त्यांनी सत्याची भूमिका घेतली असती, जनादेशाचा आदर केला असता…ठीक आहे, आता त्यांनी राजीनामा दिला आहे. बहुमत गमावलं आहे. लोकशाहीत बहुमत गमावल्यानंतर राजीनामा द्यावा लागतो. त्यांच्याबद्दल निश्चितपणे आमच्या मनात या अगोदरही प्रेम होत आणि भविष्यातही राहिल. नवीन सरकार जे अस्तित्वात येईल त्या सरकारला पाठींबा देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


हेही वाचा : संघर्ष आता राष्ट्रवादीसोबत, शिवसेना अजून भाजपसोबतचं, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया