मनसेने आठवण करून दिली राज यांच्या ‘त्या’ विधानाची

मुंबई : शिवसेनेतील बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रात्री मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यावरून मनसेने राज ठाकरे यांच्या एका विधानाची आठवण करून दिली.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षातील अनेक नेत्यांनी बंडखोरी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाविकास आघाडी सरकारला उद्या विधिमंडळात बहुमत सिद्ध करावे लागणार होते. पण त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. फेसबुक लाइव्हवरून त्यांनी तसे जाहीर केले.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या एका विधानाची आठवण करून दिली आहे. मशिदीच्या भोंग्याला मनसेने विरोध केल्यावर ठाकरे सरकारने मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती. त्यासंदर्भात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. ‘राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही,’ असे त्यांनी पत्रात शेवटी म्हटले होते. त्याची आठवण संदीप देशपांडे यांनी करून दिली.