माझ्या गाडीवरील हल्ला पूर्वनियोजित; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

uday samant

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. पुण्याच्या कात्रजमध्ये हा हल्ला करण्यात आला असून, उद्धव ठाकरेंच्या समर्थकांवर या हल्लाचा आरोप केला जात आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केला आहे. मात्र, हा हल्ला आमच्या शिवसैनिकांनी केला नसल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार विनायक राऊत यांनी म्हटले. मात्र हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे आमदार उदय सामंत यांनी म्हटले. तसेच, सभेला गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या हातात हत्यारे असल्याच आरोपही सामंत यांनी केला.

बंडखोर आमदार उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या गाडीवरील हल्ला हा पूर्वनियोजित होता. या हल्ल्यात मला काही झाले असते, तर मी माझ्या आई-वडिलांना काय उत्तर देऊ. सिग्नलला जात असताना माझ्या गाडीवर हल्ला करण्यात आला. मी सिग्नलला पोहोचल्यावर माझ्या गाडीला दोन गाड्या आल्या. त्यातून दोन पांढरा शर्ट घातलेले दोन अज्ञात उतरले. त्या दोघांच्या हातात हत्यारे होते. एकाच्या हतात बेस बॉलची स्टीक होती. दुसऱ्यांच्या हाताला दगड बांधला होता. सुपारी देऊन हा हल्ला करण्यात आला”, असे उदय सामंत यांनी सांगितले.

“एखाद्याच्या सांगण्यावरून तुम्हा हल्ला करत असाल, तर राज्याचे राजकारण कुढे चालले आहे? मला या हल्ल्याबाबत कोणालाही दोष द्यायचा नाही. महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या थराला चालले आहे. या हल्ल्यात अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी दिलसे. त्यामुळे माझी विनंती आहे, कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही असे करत असाल तर तुमचे करियर बरबाद होईल. या संदर्भात मी तक्रार दाखल करत असून, पोलिसांनी या हल्ल्याच्या मुळाशी पोहोचावे. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. या हल्ल्यानंतर माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे.”, असेही उदय सामंत यांनी म्हटले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या गटात सहभाग घेतला. तेव्हापासून राज्यात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात वाद सुरू आहे. अशातच आज उदय सामंत यांच्या गाडीचा ताफा कात्रज चौकात पोहोचला. तानाजी सावंत यांच्या घराच्या दिशेने उदय सामंत जात असताना त्यांच्या गाडीवर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी हल्ला केला. यामध्ये सामंतांच्या गाडीची मागची काच फुटली.

बंडखोर आमदार उदय सामंत हडपसरकडून कात्रज कोंढवा रोडने कात्रज चौकात आले. त्यावेळी आदित्य ठाकरेंचा ताफाही त्याच चौकाकडे येत होता. त्यामुळे शिवसैनिकांची प्रचंड मोठी गर्दी चौकात झाली होती. त्यावेळी काही शिवसैनिकांनी उदय सामंत यांची गाडी ओळखली. तसेच, गाडीला घेराव घातला. त्यानंतर गद्दार गद्दार अशा घोषणा देत उदय सामंत यांच्या गाडीला घेराव घातल्याने पोलिसांनी गाडीला सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला.


हेही वाचा – 12 जणांचं कॅबिनेट नसतानाही शिंदे सरकारने 32 दिवसांत काढले 752 जीआर