घरमहाराष्ट्रआज फैसला! सार्‍यांच्या नजरा मुंबई, ठाणे, कोकणकडे!

आज फैसला! सार्‍यांच्या नजरा मुंबई, ठाणे, कोकणकडे!

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकरता सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली असून, शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या मुंबईसह कोकणातील संभाव्य निकालावर सार्‍यांच्या नजरा लागल्या आहेत. विशेषत: सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या कोकणावर शिवसेनेची भिस्त असल्याने सरकारमधील सेनेचे संख्याबळही कोकणावर अवलंबून आहे. त्यामुळे कोकणच्या निकालावर बरेच काही अवलंबून आहे.

राज्य विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू होत आहे. या मतमोजणीसाठी आयोगाने सारी तयारी केली आहे. या निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज सेनेसाठी त्रासदायक बनले आहेत. गतवेळची संख्या सेनेला गाठता येणार नसल्याचे या अंदाजात वर्तवण्यात आल्याने आगामी भाजप सरकारमध्ये सेनेचे स्थान काय असेल, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. सर्वाधिक आमदारांची संख्या असलेल्या मुंबईत सेनेची ताकद मोठी आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी ३२ जागांवर युतीचे उमेदवार विजयी होतील, असे अंदाज एक्झिट पोलमध्ये देण्यात आले आहेत. मुंबईत युतीच्या आकडेवारीत सेनेचा वरचष्मा आहे.

- Advertisement -

मात्र विरोधी पक्षांनाही सहा ठिकाणी यशाची खात्री वाटते आहे. विशेषत: कुलाबा, धारावी, अणुशक्तीनगर, चांदिवली या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे पारडे जड मानले जात आहे. ३६ जागांपैकी सध्या शिवसेनेकडे – १४, भाजप-१५, काँग्रेस-५, इतर २ असे चित्र आहे. यातील भाजपकडील वडाळा आणि भायखळा येथील सेनेकडे आलेल्या जागांची भर पडली आहे. सध्या ताब्यात असलेल्या जागा टिकवून ठेवणे युतीसाठी विशेषत: सेनेसाठी गरजेचे बनले आहे.

मुंबईखालोखाल ठाणे जिल्ह्यात युतीची ताकद कायम राहिली आहे. ठाणे जिल्ह्यातील आमदारांची संख्या १८ आहे. यातील सहा जागा सेनेकडे तर भाजपकडे सात जागा आहेत. यातील ठाणे शहर परंपरेने सेनेकडे असूनही २०१४ च्या निवडणुकीत ही जागा भाजपचे संजय केळकर यांच्याकडे गेली होती. यावेळी युतीने निवडणूक लढवण्यात आली असली तरी मनसेचे अविनाश जाधव यांच्या उमेदवारीने जान आणली आहे. या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाधव यांना पाठिंबा दिल्याने केळकर यांच्यासाठी ही निवडणूक अटीतटीची बनणार आहे. शिवाय सेनेलाही ही जागा काढून घेण्यात रस असल्याने सेनेची मतेही जाधव यांच्या पारड्यात पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ठाण्यातील मतदानाची टक्केवारी सरासरी साडेचार टक्क्यांनी कमी झाल्याने याचा फटका भाजपला बसेल असे चित्र आहे. ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम विजय मिळवत आला आहे.

- Advertisement -

कोपरी आणि माजिवडा हे मतदारसंघ परंपरेने सेनेकडे आहेत. तिथे अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांची उमेदवारी आहे. कल्याणमध्ये डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण(प.), कल्याण(पू.) या दोन मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. कल्याण(प)मध्ये सेनेचे आमदार प्रकाश भोईर यांना उमेदवारी नाकारल्याने ते मनसेच्या तिकिटावर उभे आहेत. भोईर यांच्या उमेदवारीने सेनेची अडचण झाली आहे. पालघर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघातील लढतीही तुल्यबळ समजल्या जात आहेत. यातील नालासोपारा संघात सेनेने माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उतरवल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. या जिल्ह्यात तीन जागा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडे आहेत. तर डहाणू आणि विक्रमगड या दोन जागा भाजपकडे आहेत. पालघरची एकमेव जागा सेनेकडे होती.

रायगड जिल्ह्यातील सहा जागांपैकी विरोधी पक्षांकडे अनुक्रमे राष्ट्रवादी-२, शेकाप-२, शिवसेना-२ आणि भाजप-१असे बलाबल आहे. या निवडणुकीत पेण विधानसभा मतदारसंघात भाजपने रवी पाटील यांना उभे केल्याने जिल्ह्यातील निवडणूक चुरशीची बनली आहे. तर महाडमध्ये सेनेचे भरत गोगावले यांच्यापुढे काँग्रेसचे माणिकराव जगताप यांचे आव्हान उभे आहे. रत्नागिरीतील पाच मतदारसंघापैकी राष्ट्रवादीकडे दोन तर सेनेकडे तीन जागा होत्या. यातील गुहागरचे भास्कर जाधव यांनी सेनेत प्रवेश घेतल्याने आणि त्यांच्यापुढे सेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेले देवजी बेटकर यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. दापोली येथे योगेश रामदास कदम यांच्यापुढे राष्ट्रवादीचे संजय वसंत कदम यांनी आव्हान उभे केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आणि कुडाळ या दोन जागा सेनेकडे असून, कणकवलीत भाजपचे नितेश राणे उभे आहेत. सेनेने राणे यांना सतीश सावंत यांच्याकरवी आव्हान उभे केले आहे. या आव्हानाचा बदला घेण्यासाठी सावंतवाडीत राजन तेली आणि कुडाळमध्ये रणजित देसाई या आपल्या कार्यकर्त्यांना उभे केले आहे. या लढती तुल्यबळ मानल्या जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -