घरमहाराष्ट्रभाजपसोबतची कटुता संपवण्याचा प्रयत्न केला...; संजय राऊतांच्या वक्तव्याचा अर्थ काय?

भाजपसोबतची कटुता संपवण्याचा प्रयत्न केला…; संजय राऊतांच्या वक्तव्याचा अर्थ काय?

Subscribe

भाजप आणि शिवसेना यांनी २०१९ मध्ये आपली २५ वर्षांची युती संपुष्ठात आणली. यामुळे नाराज झालेल्या भाजपने शिवसेनेला नेस्तनाबुत करण्याचा विडाच उचलला. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या साथीने त्यांना असे करणे शक्य सुद्धा झालेले आहे.

दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमामध्ये “त्यांचे आजही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चांगले संबंध आहेत,” असे वक्तव्य केले होते. तर आज (ता. २४ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी भाजप सोबत असलेली कटुता संपवण्याचा प्रयत्न केला असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ठाकरे गटातील नेत्यांकडून भाजपच्याबाबतीत करण्यात येणाऱ्या या वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण होऊ लागले आहेत.

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता वाढल्याचे एक विधान केले होते. तसेच कटुता संपली पाहिजे असेही फडणवीसांकडून सांगण्यात आले होते. तेव्हा देखील मी सांगितले होते की, तुम्ही पुढाकार घ्या. पण ही कटुता ढवळण्याचे काम करतंय कोण?” असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisement -

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, “भाजपनेच कटुता वाढवण्याचे काम केले. ज्यापद्धतीने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसले. हल्ले केले. शिवसेना तोडली. या सगळ्यामागे भाजप आहे,” असा आरोप सुद्धा यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला. तसेच ज्याप्रकारच्या भाषेचा वापर भाजपकडून करण्यात येतो, त्यामुळे कटुता वाढते. कटुता संपवण्याच्या विचारात आम्ही सुद्धा असतो, असे म्हणत संजय राऊत यांनी राजकीय वर्तुळात चर्चेसाठी आणखी एका विषयाला मार्ग मोकळा करून दिल्याचेच दिसत आहे. पण संजय राऊत असो किंवा आदित्य ठाकरे असो यांच्या अशा या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा वैर विसरून भाजप-ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.

बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. ज्यामुळे भाजपला महाराष्ट्रात आपला पाय रोवणे सोपे झाले. बाळासाहेबांच्या निधनानंतर सुद्धा भाजप आणि शिवसेना हे गुण्यागोविंदाने नांदत होते. पण २०१९ मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर शिवसेना आणि भाजप वेगळे झाले. मुख्यमंत्री पद देण्यास भाजपने नकार दिल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. पण यानंतर लगेच भाजपने अजित पवार यांना हाताशी धरून पहाटेचा शपथविधी उरकत सरकार स्थापन केले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु अवघे तीन दिवस हे सरकार सत्तेत राहिले. सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लिनचीट मिळताच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पाठिंबा काढून घेतल्याने हे सरकार कोसळले. तर दुसरीकडे शिवसेनेने महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली. शिवसेनेचा हा डाव भाजपच्या इतक्या जिव्हारी लागला की त्यांनी शिवसेनेला महाराष्ट्रात संपवण्याचा निर्धारच केला. ज्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये कटुता निर्माण होऊन मित्र पक्षामध्ये मोठी दारी निर्माण झाली.

- Advertisement -

हेही वाचा – अमित शाह खलिस्तानींच्या रडारवर; इंदिरा गांधींची करून दिली आठवण

भाजप आणि शिवसेना वेगळे झाल्यानंतर कायमच शिवसेनेकडून भाजपवर आणि भाजपकडून शिवसेनेवर टीका करण्यात येऊ लागली. या दोन्ही पक्षातील वाढती कटूता संपवण्याचा भाजप आणि शिवसेनेतील काही नेत्यांकडून प्रयत्न करण्यात आला, परंतु हे शक्य होऊ शकले नाही. दरम्यान, २०२२ मध्ये शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून भाजपने महाविकास आघाडीचे सरकार पाडले. यानंतर भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री बनवत राज्यात पुन्हा सरकार स्थापन केले. यानंतर संजय राऊत यांना अटक करण्यात आली. पत्राचाळ प्रकरणी अटक झाल्यानंतर १०० दिवसांनी राऊतांना जमीन मंजूर झाला. यानंतर कारागृहाच्या बाहेर येताच त्यांनी ते लवकरच देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असे बोलले होते. त्यामुळे ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -