घरमुंबई‘जेम्स बॉण्ड’ म्हणून कॉनरीच बेस्ट - राज ठाकरे

‘जेम्स बॉण्ड’ म्हणून कॉनरीच बेस्ट – राज ठाकरे

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील शॉन कॉनरी यांना फेसबुकच्या माध्यमातून खास शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे.

‘जेम्स बॉण्ड’ फेम अभिनेते शॉन कॉनरी यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील शॉन कॉनरी यांना फेसबुकच्या माध्यमातून खास शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी ‘जेम्स बॉन्ड’ला वास्तवाच्या जगात घट्ट रोवून उभे करण्यामध्ये शॉन कॉनरी यांचे यश असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच कॉनरीच जेम्स बॉण्ड म्हणून बेस्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कॉनरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात की गॉडफादर म्हटले की मार्लन ब्रँडो यांचाच चेहरा जसा डोळ्यासमोर येतो तसेच जेम्स बॉण्ड म्हटले की बॉण्डपटांच्या चाहत्यांना शॉन कॉनरीच आठवतात. शीतयुद्धाच्या काळात इयान फ्लेमिंग यांच्या पुस्तकातील ‘जेम्स बॉण्ड’ हा लोकप्रिय होणे हे स्वाभाविक होते. पण त्या नायकाचे पुस्तकातले अस्तित्व प्रतिमेच्या विश्वात शॉन कॉनरी ह्यांनी अधिक उत्कट, ठळक केले. शॉन कॉनरी यांनी ६ बॉण्डपट केले पण त्या बॉण्डपटातील जेम्स बॉण्ड त्यांनी इतका घट्ट रुजवला की त्यामुळे पुढे जेम्स बॉण्ड साकारणार्‍या प्रत्येक नटाची दमछाक झाली. कधीही सूर्य न मावळण्याची वलग्ना करणार्‍या ब्रिटिश साम्रज्याचा सूर्य दुसर्‍या महायुद्धानंतर मावळतीला लागला. जागतिक राजकारणात ब्रिटनचे महत्व उत्तरोत्तर कमी होत असताना किमान प्रतिमा पातळीवर ब्रिटन ही महासत्ता आहे हा भास कायम ठेवण्यात ‘इयान फ्लेमिंग’ यांच्या प्रतिभेतून उतरलेला आणि ‘शॉन कॉनरी’ यांच्या प्रतिमेतून उभा राहिलेला ‘जेम्स बॉण्ड’ कारणीभूत आहे. प्रतिभा आणि प्रतिमेच्या संगमाच्या जोरावर एखाद्या देशाची सॉफ्ट पॉवर निर्माण होणे आणि ती अनेक दशके टिकणे हे जगातील दुर्मिळ उदाहरण असावे. शॉन कॉनरींना पडद्यावर पाहताना प्रेक्षकाला स्वतःच्यातल्या मर्यादा, उणिवा जाणवत राहतात पण तरीही मी पण मर्त्य माणूस आहे, सगळे लोभ, मोह हे मला पण सुटले नाहीत, हे दाखवत त्यांनी ‘जेम्स बॉन्ड’ला वास्तवाच्या जगात घट्ट रोवून उभं केलं, हे शॉन कॉनरी यांचे यश. म्हणूनच आजही माझे सगळ्यात आवडते बॉण्ड नट हे शॉन कॉनरीच आहेत. शॉन कॉनरी यांच्या स्मृतीस माझी विनम्र श्रद्धांजली, अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

शॉन कॉनेरी यांनी त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. पण जेम्स बॉण्ड म्हणून ते प्रेक्षकांच्या मनात कायमचे कोरले गेले. त्यांचा अभिनय कायमचा प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल. त्यांच्या सिनेकारकीर्दीत त्यांचा ऑस्कर पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्याचबरोबर तीन गोल्डन ग्लोब आणि दोन बफ्तास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मूळचे स्कॉटलंडचे असलणारे शॉन कॉनेरी यांनी इंडियाना जोन्स, द हंट फॉर रेड ऑक्टोबर आणि लास्ट क्रूसेड अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -