घरपालघरवसई-विरारमधील समुद्र किनारे, धबधब्यांवर नो एण्ट्री

वसई-विरारमधील समुद्र किनारे, धबधब्यांवर नो एण्ट्री

Subscribe

3 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू, पर्यटकांचा हिरमोड

वसई-विरारमधील समुद्र किनारे, धबधबे तसेच नैसर्गिक पर्यटनस्थळांच्या ठिकाणी जाण्याचे बेत आखणार्‍या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. येथील समुद्र किनारे, धबधबे आणि नैसर्गिक पर्यटनस्थळांवर आता पर्यटकांना काही दिवस प्रवेश मिळणार नाही. कारण पोलिसांनी या ठिकाणी मनाई आदेश लागू केले आहेत. 3 सप्टेंबरपर्यंत हे मनाई आदेश लागू राहणार असल्याने वसई-विरारमध्ये सहलीचा आनंद लुटण्यासाठी येणार्‍या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.

पावसाळ्यात वसई-विरारमधील समुद्र किनारे, धबधबे यांसह नैसर्गिक पर्यटनस्थळांवर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आदी ठिकाणांहून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. धबधबे आणि समुद्रात जीव धोक्यात घालून मौजमजा करताना अनेक पर्यटकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या बाबी लक्षात घेऊन पोलिसांनी येथील सर्वच पर्यटनस्थळांवर मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशाचा भंग करणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. पर्यटक जीव धोक्यात घालून मौजमजा करीत असल्याचे लक्षात आल्याने समुद्र किनारे, धबधबे तसेच नैसर्गिक पर्यटनस्थळांवर मनाई आदेश लागू केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शनिवार २० ऑगस्टपासून या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली असून ३ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू असणार आहेत.

- Advertisement -

=येथे असेल बंदी
अर्नाळा बीच
सुरुची बाग
रानगाव बीच
ब्रम्हपाडा बीच
भुईगाव बीच
चिंचोटी धबधबा
तुंगारेश्वर धबधबा
देवकुंडी (कामण)
राजीवली खदान

* समुद्र, धबधब्यात उतरण्यास आणि पोहण्यास मनाई
* पर्यटकांना गर्दी, सेल्फी आणि कोणतेही चित्रीकरण करण्यासही बंदी
* खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात कलम १४४ लागू

- Advertisement -

जुलैमध्येही मनाई
दरम्यान, जुलै महिन्यातही पोलिसांनी अशाच पद्धतीने मनाई आदेश जारी केला होता. त्यानंतरही सुट्टीच्या दिवशी चिंचोटी, तुंगारेश्वर धबधबा आणि समुद्र किनार्‍यांवर पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असल्याचे दिसून आले होते. पावसामुळे या ठिकाणचे धबधबे ओसंडून वाहत असल्याने पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. मनाई आदेशात होणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस बळ अपुरे पडताना दिसत आहे. त्यातच गेल्या 2 महिन्यांत चिंचोटी आणि तुंगारेश्वर धबधब्यात प्रत्येकी एक-एक आणि वसईच्या समुद्रकिनारी आतापर्यंत 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता पर्यटनस्थळांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -