भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अखेर भास्कर जाधव यांनी सोडलं मौन, म्हणाले…

भाजपमधून जर ऑफर आली तर पक्षप्रवेश करणार का? असा प्रश्न केला असता भास्कर जाधव म्हणाले की....

Bhaskar Jadhav On BJP

राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून एकनाथ शिंदे यांना वाढता पाठींबा मिळताना दिसतोय. दररोज एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी बंड पुकारलं. त्यांना अनेक आमदारांनी पाठिंबा दिला. या बंडामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळून सत्तांतर झालं. नुकतंच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांना भाजपा प्रवेशाबाबत प्रश्न केला होता. यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भास्कर जाधव यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला. यावेळी बोलताना भास्कर जाधवांनी त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून बाहेर पडतानाच्या भावना व्यक्त केल्या. “शिवसेना माझ्या आयुष्यात कधी सोडेन असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण कधीकधी नियतीच्या निर्णयापुढं आपली काही मतं, निर्णय फिके पडतात आणि आपण आत्मसमर्पण करतो. त्यामुळे मला शिवसेना सोडावी लागली. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी सोडायला नको होता हे मी आजही मान्य करतो. पण माझ्या मते पक्षांतर करणं हे कदापि चांगलं नाही. पण कधीकधी आपण नियतीच्या पुढे हतबल असतो,” असं भास्कर जाधव म्हणाले.

“तसंच राष्ट्रवादी सोडण्यासंदर्भात मी कधीही भाष्य केलं नाही. कोणावरही टीका केली नाही. शिवसेना सोडतानाही मी त्यांच्यावरही टीका केली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांबद्दलही प्रश्न येत नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडताना तेव्हा माझ्याकडे काही ठोस कारण होतं असं मला आज वाटत नाही. त्यावेळीला काही पक्षांतरर्गत गोष्टी झाल्या असतील. त्या घटना टाळता आल्या असत्या. त्यांनी त्या टाळल्या नाहीत आणि मीदेखील तडकाफडकी निर्णय घेतला. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचं माझ्याकडे कोणतंही सबळ कारण नाही”, असं देखील भास्कर जाधव यांनी सांगितलं.

यानंतर जेव्हा त्यांना भाजपमधून जर ऑफर आली तर पक्षप्रवेश करणार का? असा प्रश्न केला असता भास्कर जाधव म्हणाले की, “मी जे काम करेन ते उजळ माथ्याने आणि उघड भूमिका घेत करेन. भाजपा माझं घर जाळण्यापर्यंत पोहोचली होती. पण मी घाबरलेलो नाही. त्यामुळे भाजपात जाण्याची कधी चर्चा किंवा संबंधच आलेला नाही”. भाजपाची ऑफर आली तरी मी जाणार नाही, पण मी नाकाला जीभ लावत नाहीत. ज्या दिवशी शिवसेना सोडण्याची वेळ आली तेव्हापासून मी व्यथित आहे. राजकारणात कोणाच्या वाटयाला काय येईल सांगता येत नाही. मी कधी शिवसेना सोडेन असं वाटलं नव्हतं. त्यामुळे मी राजकारणात असलो तरी राजकारणावरील विश्वास उडाला आहे. जर ती भाजपा अडवाणी, वाजपेयी यांची असती तर गेलो असतो. पण तत्वज्ञान सांगणाऱ्या भाजपाने राजकारणाचा स्तर ओलांडला असून, महाराष्ट्राचा सुसंकृतपणा मातीत घालवला आहे. त्याची मला भयंकर चीड आहे,” असं म्हणत भास्कर जाधव यांनी भाजपवर आपला संताप व्यक्त केला.