घरमुंबईअशा गुप्त बैठका कशासाठी? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

अशा गुप्त बैठका कशासाठी? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

Subscribe

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुतणे आहेत. नातेवाईक असल्याने नातेवाईकाला घरी भेटता येतं. पण गाडीत झोपून जाणे आणि गुप्तपणे बैठका घेणे हे कशासाठी? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress) नाना पटोले (Nana Patole) (Nana Patole) यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला. अशा भेटीमुळे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीवर आपली  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबरही चर्चा झाली असून त्यांना या भेटीची माहिती दिल्याचे पटोले यांनी सांगितले. (Why such secret meetings Congress state president Nana Patoles question)

हेही वाचा – शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर रोहित पवार थेटच बोलले; काय म्हणाले वाचा-

- Advertisement -

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी पुण्यात एका उद्योजकाच्या घरात भेट झाली. या भेटीवर बोलताना पवार त्यांनी अजित पवार हे माझे पुतणे आहेत आणि पवार कुटुंबात मी वडिलधारा आहे, असे सांगत या भेटीचे समर्थन केले होते. यावर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नाना पटोले यांनी या गुप्त भेटीवर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडींवर दिल्लीतील पक्षश्रेष्ठी लक्ष ठेवून आहेत, असे पटोले म्हणाले. दरम्यान, येत्या 3 सप्टेंबरपासून प्रदेश काँग्रेसची राज्यात पदयात्रा सुरू होणार असून या यात्रेचा पहिला टप्पा 17 सप्टेंबरपर्यंत असेल. त्यानंतर गणेशोत्सव आणि इतर  सणानंतर दुसरा टप्पा सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा – अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू; कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

- Advertisement -

यावेळी पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचे केंद्र आणि राज्यातील  सरकार जनतेच्या पैशांची लूट करत आहे. भ्रष्टाचाराचे विक्रम या सरकारने केले आहेत. शेतकरी हवालदिल आहे, पेरण्या नाहीत, जिथे पेरणी झाली तिथे पीक वाळून जात आहे. शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोबदला अद्याप दिला नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतीला 12 तास वीज देण्याची घोषणा सरकारने केली, पण 8 तासही वीज मिळत नाहीत. पाणी आहे पण वीज नाही म्हणून शेतीला पाणी देता येत नाही. रेशन दुकानात धान्य नाही, तरुणवर्गाच्या हाताला काम नाही.  कंत्राटी नोकर भरती केली जात आहे. परीक्षा शुल्काच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपयांची  लूट  केली जात आहे. कृत्रिम महागाईने जनता त्रस्त आहे, हे सर्व प्रश्न पदयात्रेदरम्यान जनतेच्या समोर मांडले जातील, असे पटोले म्हणाले.

दरम्यान, ठाणे महानगरपालिका रुग्णालयात एकाच रात्रीत 18 जणांचा मृत्यू होतो, ही राज्यासाठी लाजीरवाणी घटना आहे. याआधी दोन दिवसापूर्वी याच रुग्णालयात 5 जणांचा मृत्यू झाला, पण सरकारचे डोळे उघडले नाहीत. केईम रुग्णालयात एका लहान मुलाचा हात कापण्याची वेळ आली तर, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यूही अशाच बेजबाबदारपणामुळे झाला. हे सर्व सरकारी अनास्थेचे बळी असून चौकशी करायची असेल तर या भ्रष्ट सरकारचीच करा, अशी संतप्त मागणी पटोले यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -