पावसाचा जोर वाढला, नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

राज्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाची जुलै महिना सुरु झाल्यापासून जोरदार बॅटींग सुरु आहे. मागील चार दिवसांपासून राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढत आहे. ठाणे जिल्हयातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उद्या गुरुवार १४ जुलै २०२२ रोजी सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा – खवळलेल्या समुद्राने गिळलं कुटुंब! सांगलीतील एकाच कुटुंबातील पित्यासह दोन मुलं ओमनच्या समुद्रात गेली वाहून

संपूर्ण ठाणे जिल्हयाला पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे ठाणे जिल्हयाला राज्य आपत्ती व्यवस्थापनाने ऑरेंज झोन म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमुळे केंद्र शासन आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ अमंलात आणला. या नियमानुसार पावसाळ्यात उद्भवणारी पूरस्थिती लक्षात घेता सर्व महापालिका आयुक्तांना खबरदारी घेण्याचे पत्र पाठविले आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालयांना गुरुवार १४ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. परिस्थिती पाहून शाळेला सुट्टी देण्याचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ६० अन्वये भा.दं.स १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय किंवा कायदेशीर कारवाईचा इशारा शाळांना पाठविलेल्या पत्रकात देण्यात आला आहे.

हेही वाचादगड-मातीच्या मलब्याखाली सापडल्या मृत म्हशी, मुंब्र्यातील दरडीमुळे दुर्घटना?

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाची पस्थिरिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी देखील पावसाळ्यात कोणत्याही अनुचित घटना घडू नये यासाठी शासन आणि पालिकेने वेळोवेळी केलेल्या निर्देशाचे पालक करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.